लातूरमध्ये १० रुग्णांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 07:29 PM2020-06-08T19:29:42+5:302020-06-08T19:35:24+5:30
सुटी मिळालेल्या रुग्णांमध्ये ९ ते ५८ वर्षे वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे.
लातूर : ठाणे येथील मनपाच्या रुग्णालयातून थेट लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णासह वडवळ नागनाथ येथील अतिगंभीर रुग्णाने कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, जिल्ह्यात सोमवारी १० रुग्णांना रुग्णालयातून सुटी मिळाली असून, आता जिल्ह्यात एकूण २३ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.
सोमवारी सुटी मिळालेल्या रुग्णांमध्ये ९ ते ५८ वर्षे वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. यातील काही रुग्णांना मधुमेह व उच्च रक्तदाब होता. ठाणे येथील म्युनिसिपल कार्पोरेशनच्या रुग्णालयातून १७ मे रोजी लातूरच्या रुग्णालयात गंभीर अवस्थेत एक रुग्ण दाखल झाला होता. तसेच मुंबईहून आलेला वडवळ नागनाथ येथील रुग्णही गंभीर होता. या दोन्ही रुग्णांवर लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. या दोघांनाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर यशस्वी उपचार झाल्याने सोमवारी त्यांना सुटी देण्यात आली. दरम्यान, अन्य आठ रुग्णांनाही रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. यापूर्वी १११ रुग्णांना सुटी मिळाली असून, आतापर्यंत १२१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
जिल्ह्यात एकूण २ हजार ३३ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली असून, त्यात १ हजार ८५७ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १४८ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. १ हजार ५७ व्यक्ती होम क्वारंटाईन असून, १ हजार ४२ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सोमवारी लातूरचे १५ आणि उदगीरच्या १३ व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी आले असून, रात्री उशिरा त्यांचे अहवाल प्राप्त होतील.