दाेन हजारांची लाच घेताना आगार व्यवस्थापक जाळ्यात, लातूर एसीबीच्या पथकाची कारवाई
By राजकुमार जोंधळे | Updated: April 22, 2024 21:47 IST2024-04-22T21:47:10+5:302024-04-22T21:47:34+5:30
याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाेन हजारांची लाच घेताना आगार व्यवस्थापक जाळ्यात, लातूर एसीबीच्या पथकाची कारवाई
राजकुमार जाेंधळे / लातूर : रजा मंजुरीच्या कामाचा माेबदला म्हणून दाेन हजारांची लाच स्वीकारणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या लातूर येथील आगार व्यवस्थापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने साेमवारी दुपारी २ वाजता रंगेहाथ पकडले. पथकाने त्याला ताब्यात घेतले असून, याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबीच्या सूत्रांनी सांगितले, तक्रारदार चालक (वय ४३) हा लातूर आगारात सध्या कार्यरत आहेत. लग्नकार्य आणि घर बांधकामासाठी त्यांनी २०२४-२०२५ वर्षातील १५ दिवसांची अर्जित रजा व १५ दिवस रजा राेखीकरण मंजूर हाेण्याच्या कामासाठी २० मार्च राेजी आगार व्यवस्थापक बालाजी वसंतराव आडसुळे (वय ५०) याने रजा मंजूर केल्याचा मोबदला म्हणून तक्रारदाराकडे दाेन हजाराची लाच मागितली. संबंधित तक्रारदार चालकाने लातूर येथील एसीबीकडे धाव घेतली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा लावण्याचे नियाेजन केले. ८ एप्रिल राेजी शासकीय पंचासमक्ष लाच मागणीबाबतची पडताळणी झाली. आडसुळे याने तक्रारदाराला दाेन हजारांच्या लाचेची मागणी केली. दरम्यान, आडसुळे हा शिखर शिंगणापूर येथील यात्रेत कर्तव्य बजावण्यासाठी गेला हाेता. साेमवार, २२ एप्रिल २०२४ रोजी लातूर आगारात आडसुळे याने कार्यालयात कर्तव्यावर हजर होताच दाेन हजाराच्या लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारली. यावेळी एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.