धूरमुक्त होणार प्रवास, लातूर जिल्ह्याला ७५ इलेक्ट्रिकल बसेस मिळणार!
By हणमंत गायकवाड | Published: August 18, 2023 06:14 PM2023-08-18T18:14:11+5:302023-08-18T18:14:36+5:30
लातूर बसस्थानक क्रमांक दोनमध्ये मुख्य चार्जिंग स्टेशन
लातूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हायटेक होत असून, यंत्रणा अत्याधुनिक करण्यावर भर आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता लातूर विभागात नव्या-कोऱ्या इलेक्ट्रिकल बसेस प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत. १०३ गाड्यांचा प्रस्ताव मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आला असून, किमान ७५ बसेस मंजूर होतील, असा विश्वास विभाग नियंत्रक अश्वजित जानराव यांनी व्यक्त केला आहे.
डिसेंबर अखेरपर्यंत इलेक्ट्रिकल बसेस लातूर विभागाला मिळतील. त्यासाठी प्रत्येक आगारामध्ये चार्जिंग पॉईंट करण्यात येत आहेत. तर रेणापूर नाका बसस्थानक दोन येथे मुख्य चार्जिंग स्टेशन असेल. औरंगाबाद विभागाला इलेक्ट्रिकल गाड्या मिळालेल्या आहेत. त्याच धर्तीवर लातूर विभागालाही मिळणार आहेत. २५० ते ३०० किलोमीटर क्षमतेची बॅटरी या गाड्यांना असणार आहे. या गाड्या दोन प्रकारच्या आहेत. २५० किलोमीटर अंतरापर्यंत धावेल इतकी क्षमता असणारी बॅटरी एका गाडीला आहे. तर दुसऱ्या प्रकारच्या गाडीकडे तीनशे किलोमीटर अंतर धावेल इतकी क्षमता असणारी बॅटरी आहे.
पाचही आगारांमध्ये चार्जिंग पॉईंट...
जिल्ह्यातील लातूर, औसा, निलंगा, उदगीर, अहमदपूर या पाचही आगारांमध्ये इलेक्ट्रिकल गाड्यांसाठी चार्जिंग पॉईंट असणार आहे. बॅटरी उतरल्यानंतर चार्जिंग करण्यासाठी प्रत्येक आगारात अत्याधुनिक सोय केली जात आहे.
४२ लाख रुपयांचा नफा....
नाविन्यपूर्ण योजना आणि आधुनिकतेमुळे लातूर विभागाला गेल्या तीन महिन्यांमध्ये ४२ लाख दहा हजार रुपयांचा नफा झाला आहे. एप्रिल ते मे या कालावधीतील हा नफा असून, वेगवेगळ्या योजनांमुळे एसटी तोट्यातून नफ्यात येत असल्याचेे विभाग नियंत्रक जानराव म्हणाले.
लातूर आगाराच्या बसेस धूरमुक्त...
सद्यस्थितीत लातूर आगारातील १४ बसेस स्क्रॅप करण्यात आल्या आहेत तर अनेक गाड्यांचे इंजिन बदलण्यात आले आहे. पंधरा वर्षांच्या पुढील कालावधीची एकही बस लातूर विभागात नाही. त्यामुळे एकही बस धूर सोडणारी नाही. आरटीओ नियमानुसार गाड्यांची कंडिशन आहे. नव्या गाड्यांची भर पडली आहे. आता डिसेंबरअखेर इलेक्ट्रिकल बसेसही मिळतील, असे विभाग नियंत्रक अश्वजित जानराव यांनी सांगितले.