लातूर : निलंगा, औराद आणि देवणी बाजार समितीवर भाजपाची एकहाती सत्ता

By हणमंत गायकवाड | Published: April 30, 2023 10:39 PM2023-04-30T22:39:59+5:302023-04-30T23:04:35+5:30

माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा एकतर्फी विजय

Latur BJP single handed rule over Nilanga Aurad and Devni Bazar committees election | लातूर : निलंगा, औराद आणि देवणी बाजार समितीवर भाजपाची एकहाती सत्ता

लातूर : निलंगा, औराद आणि देवणी बाजार समितीवर भाजपाची एकहाती सत्ता

googlenewsNext

लातूर : निलंगा, औराद शहाजानी आणि देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत संभाजीराव पाटील निलंगेकर आणि युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा दणदणीत विजय प्राप्त झाला असून, मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकून एकहाती सत्ता दिली आहे. निलंगा बाजार समितीत १८ पैकी १८, देवणी बाजार समितीत १८ पैकी १६ आणि औराद बाजार समितीत १८ पैकी १६ जागांवर निलंगेकर पॅनलचा विजय झाला आहे. या तिन्हीही बाजार समितीवर भाजपचा झेंडा फडकला आहे.

निलंगा बाजार समितीत अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची निवडणूक झाली. माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर व अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलसमोर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर तसेच औसा मतदारसंघाचे भाजपाचे आ. अभिमन्यू पवार यांनी पॅनल उभे करून आव्हान दिले होते. मात्र, अरविंद पाटील यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून विजयश्री खेचून आणला. विरोधकांना एकही जागा मिळू दिली नाही. पराभवाची धूळ चारली.

औराद शहाजानी कृषी उत्पन्न बाजार समितीतही भाजपने १८ पैकी १६ जागांवर विजय खेचून आणला. दोन जागा व्यापारी असोसिएशनला मिळाल्या. एकतर्फी विजय संपादन करून पुन्हा औराद शहाजानी बाजार समितीवर आपले वर्चस्व कायम ठेवण्यात आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पॅनलला यश आले आहे. फक्त दोन आडत व्यापारी असोसिएशनने जिंकल्या. निलंगा व औसा या दोन मतदारसंघातील गावांचा समावेश या बाजार समितीत आहे. ५९ गावचे कार्यक्षेत्र असून, १४ गावे औसा मतदारसंघात येतात.

देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपचा झेंडा...
देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपप्रणीत शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १६ जागा जिंकून निर्विवाद बहुमत प्राप्त केले आहे. काँग्रेसप्रणीत पॅनलला दोन जागांवर समाधान मानावे लागले. माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर तसेच अरविंद पाटील निलंगेकर, भगवान पाटील तळेगावकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली आणि विजयश्री खेचून आणला. दरम्यान, विजयी उमेदवारांची नावे घोषित होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आतषबाजी करत भव्य मिरवणूक काढली. काशिनाथ गरीबे, मनोहर पटणे, बाबूराव इंगोले, अशोक लुल्ले, नागेश जिवणे, किशोर निडवंचे, अनिल पाटील, कुमार पाटील, सतीश पाटे, नामदेव कारभारी, प्रशांत पाटील, हनुमंत बिराजदार, रामलिंग शेरे, तुकाराम पाटील, राजू गुणाले, राजकुमार मुर्गे, रमेश मन्सुरे, विजयकुमार लुल्ले, अमर पाटील, ओम धनुरे, बालाजी सूर्यवंशी, अट्टल धनुरे, ईश्वर पाटील, सलीम उंटवाले आदी कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते.

निलंगा बाजार समितीतील विजयी उमेदवार...
सहकारी संस्था मतदारसंघ शिवकुमार चिंचनसुरे, रामकिसन सावंत, गुंडेराव जाधव, लालासाहेब देशमुख, दयानंद मुळे, अरविंद पाटील, श्रीरंग हाडुळे तसेच सहकारी संस्था महिला मतदारसंघातून भागिरथी जाधव, कस्तुरबाई जाधव. इतर मागासवर्गीय मतदारसंघातून मन्मथ महालिंग स्वामी, भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून काशिनाथ म्हेत्रे, ग्रामपंचायत मतदारसंघातून रोहित पाटील, तुकाराम सोमवंशी, अनुसूचित जाती मतदारसंघातून हनमंत पाटील, आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघातून अनिल कामळे, व्यापारी मतदारसंघातून संतोष बरमदे, योगेश चिंचनसुरे हे विजयी झाले, तर हमाल मतदारसंघातून सतीश कांबळे यांचा टॉसवर विजय झाला.

Web Title: Latur BJP single handed rule over Nilanga Aurad and Devni Bazar committees election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.