बहिणीची भेट ठरली अखेरची! सख्ख्या भावांच्या दुचाकीस अपघात; एकाचा मृत्यू, दूसरा जखमी
By संदीप शिंदे | Updated: April 10, 2025 17:33 IST2025-04-10T17:32:38+5:302025-04-10T17:33:35+5:30
औसा टी पॉईंट येथे वीस दिवसांत अपघातातील दुसरा बळी; अज्ञात वाहनाची धडकेत दुचाकीवरील भावाचा अंत

बहिणीची भेट ठरली अखेरची! सख्ख्या भावांच्या दुचाकीस अपघात; एकाचा मृत्यू, दूसरा जखमी
औसा (जि. लातूर) : भरधाव वेगातील अज्ञात वाहनाच्या धडकेत एक भाऊ जागीच ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास औसा टी पॉईंट येथे घडली. बालाजी राम मोरे (वय ५५ रा. याकतपूर ता. औसा) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले, औसा तालुक्यातील याकतपूर येथील शेतकरी बालाजी राम मोरे व नेताजी राम मोरे हे दोघे सख्खे भाऊ बहिणीला भेटून दुचाकीवरून गावाकडे जात असताना औसा टी पॉईंटजवळ आले असता भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. यात बालाजी राम मोरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर नेताजी राम मोरे हे जखमी झाले आहेत. जखमी नेताजी मोरे यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली. मागील वीस दिवसांतील टी पॉईंट चौकातील हा दुसरा अपघात असून यात दोन शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. याबाबत सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करण्यात येत असून, गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बहिणीची भेट ठरली अखेरची...
अपघातातील दोघे सख्खे भाऊ सेलू येथील आपल्या बहिणीला भेटून गावाकडे परतत होते. चार किलोमीटर अंतरावर गाव आले असता हा दुर्दैवी अपघात घडला. मयत बालाजी यांना दोन मुले व एक मुलगी असून शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह होता.
उड्डाणपुल करण्याची मागणी...
नागपूर - रत्नागिरी (३६१) हा राष्ट्रीय महामार्ग औसा शहरातून जात असल्याने सतत मालवाहतुकीच्या व अवजड वाहनांची वर्दळ असते. या महामार्गावर अपघात होत असल्याने लोकांना आपला जीव गमवावा लागत असून, याचा जाब लोकप्रतिनिधींना विचारला जाईल. टी पॉईंट चौकात उड्डाणपूल लवकर बांधावा अशी मागणी मनसेचे जिल्हाप्रमुख शिवकुमार नागराळे यांनी केली.