लातूरकरांना आता पालिकेत रांग लावायची गरज नाही; शुल्क भरण्यापासून ५२ सेवा ऑनलाइन
By हणमंत गायकवाड | Published: March 12, 2024 05:04 PM2024-03-12T17:04:24+5:302024-03-12T17:04:46+5:30
आपले सरकारशी संलग्न करण्याचे काम अंतिम टप्प्यात
लातूर : महानगरपालिकेच्या अनेक सेवा आता ऑनलाइन होणार आहेत. त्यामुळे संगणक, प्रिंटर दुरुस्ती व देखभालीसाठी मनपाने अंदाजपत्रकात ९१ लाखांची तरतूद केली आहे. जवळपास ५२ सेवा ऑनलाइन होणार असून, यामुळे नागरिकांना मनपात येण्याची गरज लागणार नाही.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अन्वये लातूर शहर महापालिकेमार्फत नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने ५२ सेवांचा लाभ घेता येणार आहे. याकरिता महानगरपालिकेचे नवीन पोर्टल अद्ययावत करण्यात येत आहे. शिवाय, आपले सरकारशी लिंकिंग करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जन्म प्रमाणपत्र देणे, मृत्यू प्रमाणपत्र देणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, झोन दाखला देणे, भाग नकाशा देणे, बांधकाम परवाना देणे, जात प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र यासारखी प्रमाणपत्रे नागरिकांना ऑनलाइन मिळणार आहेत.
शुल्क भरण्यासाठी मनपात यावे लागणार नाही...
सध्या या प्रमाणपत्राचे वितरण ऑनलाइन असले तरी शुल्क भरण्यासाठी महानगरपालिकेत यावे लागत आहे. मात्र, पुढील पंधरा दिवसांत नवीन पोर्टल अद्ययावत झाल्यानंतर महानगरपालिकेत येण्याची गरज लागणार नाही. घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरता येईल आणि प्रमाणपत्र मिळवता येणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे. दरम्यान, या सेवेचा लाभ लातूर शहरातील नागरिकांना पंधरा दिवसांनंतर मिळेल, असे महानगरपालिकेतून सांगण्यात आले.
या सेवा मिळणार ऑनलाइन....
जन्म प्रमाणपत्र देणे, मृत्यू प्रमाणपत्र देणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, झोन दाखला देणे, भाग नकाशा देणे, बांधकाम परवाना देणे, जात प्रमाणपत्र देणे, भोगवटा प्रमाणपत्र, अग्निशमन ना हरकत दाखला देणे, अग्निशमन अंतिम ना हरकत दाखला देणे, मालमत्ता कर उतारा देणे, थकबाकी नसल्याचा दाखला देणे, नव्याने कर आकरणी, कराचे मागणी पत्र तयार करणे, कर माफी मिळणे, स्वयंमूल्यांकन, आक्षेप नोंदविणे, नवीन परवाना मिळणे, परवान्याचे नूतनीकरण, परवाना हस्तांतरण, परवाना दुय्यम प्रत, व्यवसायाचे नाव बदलणे, व्यवसाय बदलणे, परवाना रद्द करणे, कालबाह्य परवान्यासाठी नूतनीकरण सूचना, नवीन जाहिरात अवकाश चिन्ह, परवाना व नूतनीकरण, व्यवसाय परवाना नूतनीकरण आदी ५२ सेवा ऑनलाइन मिळणार आहेत.