लातूर शहराच्या पाणीपुरवठ्यात पंधरा दिवसांपासून अडथळा
By हणमंत गायकवाड | Published: April 27, 2023 08:08 PM2023-04-27T20:08:20+5:302023-04-27T20:08:40+5:30
चार दिवसांआड पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले; अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा परिणाम
लातूर :लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात मुबलक पाणीसाठा असला तरी गेल्या पंधरा दिवसांपासून शहराच्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत आहे. धनेगाव हेडक्वार्टर्स येथील ३३ केव्ही सबस्टेशन येथील वीजपुरवठ्यामध्ये सातत्याने व्यत्यय येत असल्याने लातूर शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागत आहे. याच कारणामुळे शनिवारचा शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
२०१६ च्या अभूतपूर्व पाणीटंचाईनंतर लातूर शहरामध्ये पाणीटंचाई नाही. मांजरा धरणात मुबलक पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. पण, गेल्या पंधरा दिवसांपासून चार दिवसांत पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. सातत्याने रोहित्र बिघडत आहे. वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे लातूर शहराला पाणीपुरवठा नियमाप्रमाणे केला जात नाही. शहरात गेल्या पंधरा दिवसांत अनेक भागांमध्ये आठ दिवसाला पाणी सोडले होते. आताही शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. वीज वाहिनी बंद असल्यामुळे पाणी उचलता येणार नाही, असे पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात आले. दरम्यान, या ना त्या कारणामुळे लातूर शहरातील नागरिकांना पाणीपुरवठ्याबाबत गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
पंधरा दिवसांपासून अवकाळी पाऊस
पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात व धनेगाव परिसरामध्ये वादळ व अवकाळी पाऊस होत असल्याचे कारण महानगरपालिकेने दिले आहे. त्यामुळे विद्युत वाहिनीमध्ये वारंवार बिघाड होत आहे, असेही महापालिकेचे म्हणणे आहे. वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित होत असून, त्याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर होत आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेत पाणीपुरवठा करता येत नाही. शनिवारी २९ एप्रिल रोजी दिवसभर वीज वाहिनी बंद ठेवून वीज वाहिनीच्या परिसरातील झाडांच्या फांद्या तोडणे, तसेच इतर दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे शनिवारी शहरात पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे स्पष्टीकरण महानगरपालिकेने दिले आहे. या गैरसोयीबद्दल शहरातील नागरिकांनी मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा उपायुक्तांनी केले आहे.