लातूर मनपात मानांकन नसलेल्या इलेक्ट्रिकल साहित्याची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 05:44 PM2018-09-12T17:44:19+5:302018-09-12T17:44:57+5:30
आयुक्तांनी केला पंचनामा; विभाग प्रमुखांच्या चौकशीचे आदेश
लातूर : लातूर महानगरपालिकेतील इलेक्ट्रिकल विभागात बरेच साहित्य आयएसआय मानांकन नसलेले खरेदी करण्यात आले असून, मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी बुधवारी अचानक केलेल्या तपासणीत ही बाब उघड झाली.
लातूर शहरातील अनेक प्रभागांत पथदिवे बंद आहेत. त्या पथदिव्यांची वॉरंटी संपली की नाही किंवा हे साहित्य कसे खरेदी करण्यात आले याची अचानक पाहणी मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी विद्युत विभागात जाऊन बुधवारी केली. यावेळी काही साहित्य आयएसआय मानांकन नसलेले खरेदी झाल्याचे निदर्शनास आले. शिवाय, वॉरंटी संपली नसलेले दिवे बंद आहेत. ते बदलून घेतले नसल्याचे आढळले. शहरातील पथदिवे बंद असताना इलेक्ट्रिकल विभागाने ज्यांची वॉरंटी संपली नाही, ते पथदिवे संबंधित कंपनीकडून बदलून का घेतले नाहीत, असा प्रश्न विद्युत विभाग प्रमुखांना केला. मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
आयएसआय मानांकन नसलेले साहित्य खरेदी का केले, असाही प्रश्न त्यांनी केला. मात्र विभाग प्रमुखांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यांच्या दालनात साहित्य खरेदीचे रेकॉर्डही अद्ययावत आढळले नाही. त्यामुळे मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी विभाग प्रमुखाला कारणे दाखवा नोटीस जागेवरच दिली. खुलासा समाधानकारक न आल्यास निलंबित केले जाईल, असेही त्यांनी यावेळी सुचित केले.