Latur: पाण्याच्या शोधात फिरत असलेल्या हरिणाचा अपघातात मृत्यू, श्वानांनी केला पाठलाग
By आशपाक पठाण | Published: May 24, 2023 06:09 PM2023-05-24T18:09:06+5:302023-05-24T18:09:36+5:30
Latur: उन्हाचा पारा ४१ अंशावर जात असल्याने माणसं पाण्यासाठी व्याकूळ होत आहेत. अनेकजण उष्णतेपासून बचावासाठी विविध उपाययोजना करीत आहेत. दुपारच्या वेळी तर शहरातील रस्त्यांवरही शुकशुकाट पहायला मिळत आहे.
- आशपाक पठाण
लातूर : उन्हाचा पारा ४१ अंशावर जात असल्याने माणसं पाण्यासाठी व्याकूळ होत आहेत. अनेकजण उष्णतेपासून बचावासाठी विविध उपाययोजना करीत आहेत. दुपारच्या वेळी तर शहरातील रस्त्यांवरही शुकशुकाट पहायला मिळत आहे. जिथे माणसं बेचैन झाली तिथे मुक्या जिवांचे काय. चाकूर तालुक्यातील घरणी ते आष्टामोड शिवारात पाण्याच्या शोधात भटकंती करीत असलेल्या एका हरिणाचा श्वानांनी पाठलाग केला. रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या हरिणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी १२.४० वाजण्याच्या सुमारास घडली.
लातूर शहर वाहतूक शाखेचे पथक घरणी-आष्टामोड मार्गावर ओव्हरस्पीडच्या केसेस करीत थांबले होते. जवळपास अर्ध्या तासापासून एक हरीण पाण्यासाठी इकडे तिकडे भटकंती करीत असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी पाहिले. त्याचवेळी एकट्या हरिणाला पाहून काही श्वानांनी त्याचा पाठलाग सुरू केला. उन्हामुळे पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या हरिणाने श्वानापासून सुटका करून घेत मुख्य मार्ग गाठला. पण रस्ता ओलांडत असताना भरधाव आलेल्या एका वाहनाने त्याला जोराची धडक दिली. याबाबतची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे कर्मचारी दिलीप राजुळे यांनी जखमी हरिणाच्या जवळ गेले. त्यांच्या गाडीत असलेला कपड्याने जखमी हरिणाच्या पोटाला बांधले. बाटलीत असलेले पाणीही पाजले. जखमीला तात्काळ मदत मिळेल म्हणून पक्षीमित्र महेबूब चाचा यांनाही फोन केला. मात्र, काही वेळातच जखमी हरिणाचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती वन परिमंडळ अधिकारी सचिन रामपुरे यांना देण्यात आली. त्यांनी चाकूरच्या वनअधिकाऱ्यांना याची माहिती दिल्यावर काही वेळातच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी आले. पंचनामा करून मयत हरिणाला घेऊन गेले. वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी दिलीप राजुळे यांनी घटनेनंतर तत्परता दाखविल्याने त्यांचे वरिष्ठांनी कौतुक केले.
शेतशिवारात वन्य प्राण्यांसाठी पाणी ठेवा...
उष्णता वाढल्याने पक्षी, प्राणी पाण्यासाठी व्याकूळ होऊन भटकंती करीत आहेत. शेतात ज्यांच्याकडे विहीर, बोअर आहे, पाण्याची सुविधा आहे, अशा शेतकऱ्यांनी मुक्या प्राण्यांना पाणी पिता येईल, यासाठी सोय करावी. तसेच वनविभागाने यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. पाण्याच्या शोधात भटकंती करीत असलेल्या त्या हरिणाला पाणी मिळाले असते तर कदाचित अपघात झाला नसता, असे पक्षीमित्र महेबूब चाचा यांनी सांगितले.