१५ ते १८ वयोगटाच्या लसीकरणात लातूर जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 06:13 PM2022-01-06T18:13:44+5:302022-01-06T18:14:09+5:30
जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटात १ लाख ३४ हजार ३१४ मुला-मुलींचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे.
लातूर : कोरोनाला रोखण्यासाठी जिल्ह्यात लसीकरणाने गती घेतली असून, १५ ते १८ वयोगटात गेल्या तीन दिवसांत ३२ हजार २१३ मुला-मुलींचे लसीकरण झाले आहे. या वयोगटाच्या लसीकरणात लातूर जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर असून, सांगली, धुळे आणि सातारा अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थानावर आहेत. जिल्ह्यात उद्दिष्टाच्या २३.९८ टक्के लसीकरण झाले आहे.
जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटात १ लाख ३४ हजार ३१४ मुला-मुलींचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी लातूर शहरात २२ हजार १७५ मुला-मुलींना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. पैकी ३ ते ५ जानेवारी दरदम्यान ३३ हजार २११ मुला-मुलींना लस देण्यात आली आहे. ६ जानेवारी रोजी रात्री १० वाजेपर्यंत त्यात ५ ते ७ हजारांची वाढ होण्याची शक्यता आहे. तथापि, लातूर शहरात २२ हजार १७५ पैकी १३ हजार ९७६ मुला-मुलींना लस देण्यात आली आहे.
शाळा-महाविद्यालयनिहाय कॅम्पचे नियोजन करण्यात आले आहे. खाजगी शिकवणी वर्गातही कॅम्प होत आहेत. पुढील दोन दिवसात या वयोगटातील लसीकरण शंभर टक्के पूर्ण होईल, अशी अपेक्षा लातूर महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. महेश पाटील यांनी व्यक्त केली. मुला-मुलींना लस देण्यत लातूर जिल्हा (२३.९८) राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. प्रथम क्रमांकावर सांगली (३३.६७), द्वितीय धुळे (२६.४४) आणि तृतीय क्रमांकावर सातारा (२५.३४) टक्के आहे.