लातूर जिल्ह्यात ढग आले दाटून; पावसाविना गेले फिरून!

By हरी मोकाशे | Published: August 19, 2023 05:02 PM2023-08-19T17:02:01+5:302023-08-19T17:02:40+5:30

मघामुळे आशा वाढल्या : गतवर्षीच्या तुलनेत २०५ मिमी पावसाची तूट

Latur district was covered in clouds; Walk without rain! | लातूर जिल्ह्यात ढग आले दाटून; पावसाविना गेले फिरून!

लातूर जिल्ह्यात ढग आले दाटून; पावसाविना गेले फिरून!

googlenewsNext

लातूर : जिल्ह्यात तीन आठवड्यांपासून वरुणराजाने उघडीप दिली आहे. दोन दिवसांपूर्वी निघालेल्या मघा नक्षत्रामुळे ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या असून खरीप पिकांसाठी पावसाची नितांत गरज आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३२३.९ मिमी पाऊस झाला आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत २०५.४ मिमी पावसाची तूट आहे.

जिल्ह्यात यंदा विलंबाने पावसाला सुरुवात झाली. मृग कोरडा गेल्याने खरीप पेरणीस उशीर झाला. जून अखेरीस पासून काही ठिकाणी पेरणीस सुरुवात झाली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खरिपाच्या पेरण्या सुुरू होत्या. वेळेवर पावसाची बरसात न झाल्याने जिल्ह्यात उडीद, मूग आणि तुरीच्या पेऱ्याच्या क्षेत्रात घट झाली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. दरम्यान, सतत रिमझिम तर कधी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे आंतर मशागतीची कामे खोळंबली होती. परिणामी, पिकांत तण वाढले होते.

जुलैअखेरपासून बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याने पिकांतील मशागतीच्या कामांना वेग आला होता. शेतकरी तण नष्ट करण्यासाठी तणनाशकांची फवारणी करीत होते. तद्नंतर जवळपास तीन आठवड्यांपासून पावसाने उघडीप दिली आहे.

सोयाबीन फुलोऱ्याच्या स्थितीत...
मध्यंतरी पिकांपुरता पाऊस झाल्याने सोयाबीन जोमात उगवले. त्यानंतर आंतरमशागतीच्या कामांना वेग आला होता. सध्या सोयाबीन हे फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत सोयाबीनसह अन्य पिकांना पावसाची गरज आहे. परंतु, पावसाने उघडीप दिल्याने हलक्या रानावरील पिके दुपार धरू लागली आहेत. दरम्यान, गुरुवारपासून मघा नक्षत्रास सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.

मध्यम प्रकल्पात २० टक्के जलसाठा...
जिल्ह्यातील ८ मध्यम प्रकल्पात सध्या २० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. लघु पाटबंधारेच्या १३४ प्रकल्पात २३ टक्के तर २७ बॅरेजेसमध्ये ३३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. प्रकल्पातील जलसाठा वाढण्यासाठी तसेच पिकांसाठी पावसाची गरज आहे.

सर्वाधिक पाऊस देवणी तालुक्यात...
तालुका - आतापर्यंतचा सरासरी पाऊस मिमीमध्ये

लातूर - ३०५.६
औसा - २५१.९
अहमदपूर - ३०४.४
निलंगा - ३०८.०
उदगीर - ४४६.७
चाकूर - २७१.२
रेणापूर - २५६.५
देवणी - ५०१.८
शिरुर अनं. - ३५०.९
जळकोट - ३७८.७
एकूण - ३२३.९

गेल्यावर्षीच्या तुलनेत मध्यम प्रकल्पात ६३ टक्के पाणी कमी...
जिल्ह्यात एकूण ८ मध्यम प्रकल्प असून त्यावर विविध गावांच्या जल योजना आहेत. मात्र, जिल्ह्यात अद्यापही सातत्याने दमदार पाऊस झाला नाही. परिणामी, जलसाठ्यात वाढ झाली नाही. व्हटी आणि तिरू मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा अद्यापही झाला नाही. तावरजा प्रकल्पात केवळ २ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच कालावधीत मध्यम प्रकल्पात ८३ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. सध्या केवळ २० टक्के आहे.

दोन प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा...
प्रकल्प - सध्याच्या उपयुक्त पाणीसाठा - गेल्या वर्षीचा पाणीसाठा
तावरजा - २% - ४१%
रेणापूर - २४% - ९८%
व्हटी - ०० - ६७%
तिरू - ०० - ८१%
देवर्जन - ३९% - १००%
साकोळ - ५४% - १००%
घरणी - २८% - १००%
मसलगा - ३०% - ८७%
एकूण - २०% - ८३%

Web Title: Latur district was covered in clouds; Walk without rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.