लातूर विभागाचा बारावीचा ८६.०८ टक्के निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 03:06 PM2019-05-28T15:06:19+5:302019-05-28T15:07:57+5:30
निकालात लातूर जिल्हा अव्वल तर उस्मानाबाद पिछाडीवर
लातूर : बारावीच्या परीक्षेस लातूर विभागीय मंडळाचा निकाल ८६़.०८ टक्के लागला असून, परीक्षेला सामोरे गेलेल्या ८५ हजार ९४९ विद्यार्थ्यांपैकी ७३ हजार ८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २़२३ टक्क्यांनी लातूर विभागाचा निकाल घसरला आहे. दरम्यान मंडळात लातूर जिल्हा अव्वल स्थानी असून नांदेड दुसऱ्या तर उस्मानाबाद जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.
लातूर विभागीय मंडळांतर्गत असलेल्या नांदेड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातून ८६ हजार १४७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८५ हजार ९४९ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले पैकी ७३ हजार ९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेतून ३६ हजार १०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी ३३ हजार ५९५ उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल ९३़०५ टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेतून १० हजार ८३४ विद्यार्थी परीक्षेस सामोरे गेले. पैकी ९ हजार ९७० उत्तीर्ण झाले असून वाणिज्य शाखेचा निकाल ९२़०३ टक्के लागला आहे. तर कला शाखेतून ३४ हजार २८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी २६ हजार ८९३ उत्तीर्ण झाले. या शाखेचा निकाल ७८.४४ टक्के लागला आहे. व्होकेशनलमधून ४ हजार ७२६ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ५३० उत्तीर्ण झाले असून, या विभागाचा निकाल ७४.६९ टक्के लागला आहे.
लातूर मंडळांतर्गत लातूर जिल्ह्यातून ३४ हजार २४६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २९ हजार ९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा निकाल ८७.५० टक्के लागला आहे. नांदेड जिल्ह्यातून ३६ हजार ४४ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. त्यापैकी ३१ हजार ७० उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा निकाल ८६़.२० टक्के लागला आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यातून १५ हजार ६५९ विद्यार्थी परीक्षेस सामोरे गेले होते. पैकी १२ हजार ९५३ उत्तीर्ण झाले असून उस्मानाबाद जिल्ह्याचा निकाल ८२़.७२ टक्के लागला आहे.