Latur: ई- कुबेर, व्हीपीडीएमुळे जिल्हा परिषदेचे स्वउत्पन्न होणार कमी !

By हरी मोकाशे | Updated: March 17, 2025 18:17 IST2025-03-17T18:17:10+5:302025-03-17T18:17:26+5:30

दुर्बल घटक, आरोग्य केंद्रस्थानी : जिल्हा परिषदेचे २९ कोटी शिलकीचे अंदाजपत्रक

Latur: E-Kuber, VPDA will reduce the self-generated income of the Zilla Parishad! | Latur: ई- कुबेर, व्हीपीडीएमुळे जिल्हा परिषदेचे स्वउत्पन्न होणार कमी !

Latur: ई- कुबेर, व्हीपीडीएमुळे जिल्हा परिषदेचे स्वउत्पन्न होणार कमी !

लातूर : ई- कुबेर, व्हीपीडीए पोर्टलमुळे वेतन, पेन्शन तसेच योजनांचा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. त्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नावर होत आहे. आगामी वर्षात उत्पन्न जवळपास ११ कोटी ६५ लाखांची घट होणार आहे. दरम्यान, सध्याच्या नाविण्यपूर्ण योजनांना अधिक गती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिलकी अंदाजपत्रकात विशेष तरतूद करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक राहुलकुमार मीना यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पीय सभा सोमवारी झाली. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी आप्पासाहेब चाटे यांनी जिल्हा परिषदेचा सन २०२४-२५ चा ६४ कोटी ५८ लाख ७६ हजार १०६ रुपयांच्या जमेचा आणि ३५ कोटी ५० लाख ९१ हजार रुपये खर्चाचा अर्थसंकल्प सादर केला. प्रशासक मीना यांनी तो मंजूर केला. यावेळी विभागप्रमुखांची उपस्थिती होती.

कोणत्या विभागासाठी किती रुपयांची तरतूद...
पदाधिकारी, सदस्य - २ कोटी ३२ लाख
सामान्य प्रशासन - १ कोटी ४२ लाख
शिक्षण - ४ कोटी ४६ लाख
बांधकाम - ४ कोटी ६४ लाख
लघु पाटबंधारे - २० लाख
आरोग्य - २ कोटी ३७ लाख
पाणीपुरवठा - ३ कोटी २० लाख
कृषी - १ कोटी ६ लाख
पशुसंवर्धन - २ कोटी २४ लाख
पंचायत - १५ लाख
समाजकल्याण - ५ कोटी १० लाख
महिला व बालकल्याण - १ कोटी ६४ लाख
संकीर्ण - ३ कोटी ९३ लाख
भांडवली खर्च - २ कोटी ७५ लाख

आरोग्य केंद्रांच्या गुणवत्ता वाढीवर भर...
जिल्ह्यातील ११ प्राथमिक आरोग्य केंद्र, ७ उपकेंद्रांना एनकॉसचे राष्ट्रीय मानांकन मिळाले आहे. उर्वरित सर्व आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय मानांकन मिळविण्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री, उपकरणे आणि इतर मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.

पशुवैद्यकीय दवाखान्यात सुविधा वाढणार...
पशुपालन हा शेतीपूरक व्यवसाय आहे. त्यास चालना देण्यासाठी आर्थिक तरतूद वाढविण्यात आली आहे. पशुधनासाठी औषधी, लसींसाठी २५ लाख पशुधनातील वंधत्व निवारणासाठी २५ लाख आणि सोलार पॅनल उभारणी व दुरुस्तीसाठी १ कोटी रुपयांचा निधी ठेवण्यात आला आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषी औजारे, संयत्रे देण्यासाठी निधी राखीव ठेवण्यात आला आहे.

माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुतळ्यासाठी एक कोटी...
माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा जिल्हा परिषदेच्या प्रांगणात पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी १ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, स्पर्धा, पुरस्कारासाठी तरतूद करण्यात आली आहे.

अधिक दर्जेदार सुविधेवर भर
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, दिव्यांग, महिलांच्या प्रगतीसाठी कल्याणकारी उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा अधिक दर्जेदार देण्यावर भर आहे.
- राहुलकुमार मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी.

दोनदा आढावा घेतला
नाविण्यपूर्ण उपक्रमांतून गरजूंना सक्षम करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी सीईओंच्या अध्यक्षतेखाली विभागप्रमुखांच्या बैठका घेऊन दोनदा आढावा घेण्यात आला.
- आप्पासाहेब चाटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी.

Web Title: Latur: E-Kuber, VPDA will reduce the self-generated income of the Zilla Parishad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.