२० हजारांची लाच घेणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकासह कर्मचाऱ्यास पकडले

By हरी मोकाशे | Published: June 6, 2024 06:46 PM2024-06-06T18:46:04+5:302024-06-06T18:46:10+5:30

गुन्ह्यात अटक न करण्यासाठी केली पैश्याची मागणी

Latur employee along with a police sub inspector was arrested for accepting a bribe of 20,000 | २० हजारांची लाच घेणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकासह कर्मचाऱ्यास पकडले

२० हजारांची लाच घेणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकासह कर्मचाऱ्यास पकडले

लातूर : गुन्ह्याच्या तपास कामात मदत करुन अटक न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पोलिस हवालदारास गुरुवारी चाकूर तहसील कार्यालयाच्या परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. दरम्यान, लाच घेण्यास प्रोत्साहन दिल्याने चाकूरच्या पोलिस उपनिरीक्षकासहही ताब्यात घेण्यात आले आहे.

शेतातील सामाईक बंधाऱ्यावरील झाड तोडण्याच्या कारणावरुन तक्रारदाराचे भांडण झाले होते. त्यामुळे अंगद चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन तक्रारदार व त्यांच्या वडिलांविरुध्द चाकूर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, तक्रारदारांनीही अंगद चव्हाण व त्यांच्या नातेवाईकांविरुध्द फिर्याद दिल्याने परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपास कामात मदत करुन गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तक्रारदारास पोलिस हवालदार पांडुरंग दिगंबर दाडगे (रा. भाटसांगवी, हमु. नाथनगर, विवेकानंद चौक, लातूर) व पोलिस उपनिरीक्षक दिलीप रघुत्तमराव मोरे (हमु. चाकूर) यांनी २५ हजारांच्या लाचेची मागणी केली.

दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पडताळणी करण्यात आली असता आरोपी दाडगे यांनी तक्रारदाराकडे २५ हजारांच्या लाचेची मागणी करुन तडजोडीअंती २० हजार स्विकारण्याचे मान्य केले. लाच घेण्यास आरोपी माेरे यांनी प्रोत्साहन दिले. गुरुवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून चाकूर तहसील कार्यालयाच्या खुल्या जागेत २० हजारांची लाच घेताना दाडगे यांना रंगेहात पकडले. तसेच आरोपी मोरे यांना चाकूर पोलिस ठाण्यातून ताब्यात घेतले. लाचेची रक्कम जप्त करण्यात आली. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत चाकूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

Web Title: Latur employee along with a police sub inspector was arrested for accepting a bribe of 20,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.