पिकविम्याचे ३८ कोटी शेतक-यांच्या खात्यावर, पावणेतीन महिन्यांपासून शेतक-यांची सुरू होती धावाधाव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 08:39 PM2018-08-24T20:39:59+5:302018-08-24T20:40:12+5:30
गेल्या पावणेतीन महिन्यांपासून जिल्ह्यातील २ लाख १० हजार शेतकरी पीकविम्यासाठी धावाधाव करीत होते. पीकविम्याच्या घोळाचा गुंता मात्र सुटत नव्हता. अखेर हा घोळ संपुष्टात आला असून, या शेतक-यांसाठी पीकविमा कंपनीने ३८ कोटी ४९ लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. ही रक्कम शेतक-यांच्या खात्यावर वर्ग करणे सुरू झाले आहे.
- हरी मोकाशे
लातूर - गेल्या पावणेतीन महिन्यांपासून जिल्ह्यातील २ लाख १० हजार शेतकरी पीकविम्यासाठी धावाधाव करीत होते. पीकविम्याच्या घोळाचा गुंता मात्र सुटत नव्हता. अखेर हा घोळ संपुष्टात आला असून, या शेतक-यांसाठी पीकविमा कंपनीने ३८ कोटी ४९ लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. ही रक्कम शेतक-यांच्या खात्यावर वर्ग करणे सुरू झाले आहे.
गतवर्षीच्या पावसाळ्यात सुरुवातीस पावसाचा गुंगारा व त्यानंतर अतिवृष्टी झाली होती. दरम्यान, पिकांचे संरक्षण व्हावे म्हणून जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी होत पिकांचा विमा हप्ता भरला होता. लातूरसह राज्यातील इतर जिल्ह्यांत मे अखेरीसपर्यंत पीकविमा मंजूर होऊन वाटपास सुरुवात झाली होती. परंतु, लातूर जिल्ह्यात मात्र पीकविम्याचा घोळ सुरू झाला होता. सुरुवातीस अडीचशे कोटी रुपये पीकविमा मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात वाटपास सुरुवात झाल्यानंतर १०० कोटींची तफावत निर्माण होऊन १५० कोटींचा पीकविमा वाटप झाला होता.
पहिल्या टप्प्यात बहुतांश शेतकºयांनी पीकविम्याचा लाभ न मिळाल्याने या शेतकºयांची धावाधाव सुरू होती. दरम्यान, पीकविमा कंपनीने दुसरा टप्पा जाहीर करीत ५७ कोटी ८६ लाख रुपये उपलब्ध करून दिले होते. दोन टप्पे झाले असतानाही जिल्ह्यातील जवळपास ५० गावे पीकविम्यापासून वंचितच होती. त्यामुळे या गावातील शेतकºयांनी जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यासह पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींकडे तक्रार करुन संताप व्यक्त केला होता. पीकविमा मिळावा म्हणून शेतकºयांची धावाधावही सुरू होती. दरम्यान, या संदर्भात वारंवार ‘लोकमत’मधून सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्याची दखल घेत तसेच लोकप्रतिनिधी, शेतकºयांच्या पाठपुराव्यामुळे तिसºया टप्प्यात लातूर जिल्ह्यास ३८ कोटी ४९ लाख रुपये पीकविमा कंपनीने उपलब्ध करून दिले आहेत. पीकविमा लाभार्थी शेतकºयांची यादी व रक्कम संबंधित बँकांकडे पाठविण्यात आली आहे.
२ लाख १० हजार शेतकºयांना पीकविम्याचा लाभ...
तिसºया टप्प्यात ३८ कोटी ४९ लाख रुपये उपलब्ध झाले असून, त्याचा लाभ २ लाख १० हजार शेतकºयांना मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात ३ लाख ८ हजार ४७८ शेतकºयांसाठी १३४ कोटी तर दुस-या टप्प्यात २ लाख ७४ हजार ९०० शेतकºयांसाठी ५७ कोटी ८६ लाख रुपये उपलब्ध झाले होते. जिल्ह्यातीलएकूण ७ लाख ९३ हजार ३७८ शेतक-यांना २३० कोटी ३५ लाख रुपये मिळत आहेत.
वंचित ५० गावांचा समावेश...
तिसºया टप्प्यात पीकविम्यापासून वंचित असलेल्या जवळपास ५० गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता कुठलाही शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहणार नाही. विमा कंपनीने लाभार्थी शेतक-यांची यादी व पैसे बँकांकडे वर्ग केले आहेत, अशी माहिती नॅशनल इंशुरन्स कंपनीचे शाखा व्यवस्थापक विजय पस्तापुरे यांनी दिली.
जिल्हा बँकेकडे ४ कोटी वर्ग...
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पीकविम्यापोटी ४ कोटी ३३ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहे. ही रक्कम शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करणे सुरू आहे. लवकरच त्याचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे व्यवस्थापक एच.जे. जाधव यांनी दिली.