Latur: शक्तिपीठ महामार्गाच्या सीमांकनासाठी आलेल्यांना शेतकऱ्यांनी परत पाठविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 17:55 IST2025-04-18T17:40:39+5:302025-04-18T17:55:41+5:30
शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून सातत्याने विरोध करण्यात येत आहे.

Latur: शक्तिपीठ महामार्गाच्या सीमांकनासाठी आलेल्यांना शेतकऱ्यांनी परत पाठविले
लातूर : शक्तिपीठ महामार्गाच्या सीमांकनासाठी महसूल आणि खासगी कंपनीचे अधिकारी, कर्मचारी गुरुवारी रेणापूर तालुक्यातील चाडगाव येथे आले होते. तेव्हा शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध दर्शवित त्यांना परत पाठविले.
शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून सातत्याने विरोध करण्यात येत आहे. गुरुवारी रेणापूर तालुक्यातील चाडगाव येथे रेणापूर महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच मोनार्क प्रा.लि. कंपनीचे अधिकारी सीमांकन करण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास सुरुवात केली. बाधित शेतकऱ्यांनी त्यास विरोध करीत गावशिवारात कुठल्याही प्रकारचे सीमांकन अथवा मोजणी करू देणार नाही, असा पवित्रा घेतला.
कुठल्याही परिस्थितीत रेणापूर आणि अंबाजोगाई तालुक्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांना शेतावर येऊ देणार नाही, असा इशारा दिला. शेतकऱ्यांचा विरोध पाहता अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला.
याप्रसंगी शक्तिपीठ महामार्ग विरोधी बाधित शेतकरी समितीचे गजेंद्र येळकर, आत्माराम माने, संजय माने, बालाजी हाके, नीळकंठ भिसे, ॲड. दिलीपराव कुलकर्णी, प्रकाश चव्हाण, रामेश्वर चव्हाण, श्रीकिशन मेटे, सतीश भिसे, शिवराज माने, उपसरपंच नवनाथ माने यांच्यासह चाडगाव, मोरवड, भोकरंबा, मोटेगाव, नांदगाव, सायगाव, भारज या गावांतील बाधित शेतकरीही उपस्थित होते.
आमचा कायमचा विरोध
चाडगावहून मोरवड, नांदगाव या गावांना कॅनॉलद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी नेले जाते. या जमिनी बागायती असल्याने शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध आहे, असे गजेंद्र येळकर यांनी सांगितले.