उपोषणकर्ता कोठडीत अन् जनावरं गो शाळेत; लातूरमध्ये मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटलाच बांधली होती गुरं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 11:41 AM2018-08-23T11:41:14+5:302018-08-23T11:46:21+5:30
गुरा-ढोरांसह गेल्या अनेक दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या गुणवंत म्हेत्रे कुटुंबातील तिघांवर शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलिसात बुधवारी नोंद करण्यात आला.
लातूर : गुरा-ढोरांसह गेल्या अनेक दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या गुणवंत म्हेत्रे कुटुंबातील तिघांवर शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलिसात बुधवारी नोंद करण्यात आला. नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गुरे बांधून रहदारीला अडथळा केल्यामुळे गुन्हा नोंद करण्याची कारवाई पोलिसांनी केली. अटकेनंतर तिन्ही उपोषषकर्त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत, तर जनावरांची सोय गो शाळेत करण्यात आली.
म्हेत्रे हे आपल्या कुटुंबासह गेल्या काही दिवसांपासून नवीन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गुरा-ढोरांसह उपोषणाला बसले होते. प्रशासनाकडून त्यांच्या मागणीची दखल घेतली नाही. दरम्यान, दोन-तीन दिवसांपासून पाऊस असल्याने त्यांनी आपली गुरे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बांधली. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाण्या-येण्याला अडथळा होऊ लागला. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना गुरं तेथून हलविण्यासाठी सांगितले. परंतु, त्यांनी ते हलविले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा केल्याच्या कारणावरून कारवाई करण्यात आली.
याबाबत नंदकिशोर पांडुरंग करले यांनी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार गुणवंत मारोती म्हेत्रे, अयोध्याबाई गुणवंत म्हेत्रे आणि बालाजी गुणवंत म्हेत्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अटक करुन त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तर जनावरांची रवानगी गो शाळेत करण्यात आली. पुढील तपास सपोउपनि. रामेश्वर पडवळ करीत आहेत.