Latur: माेबाइल दुकान फाेडणाऱ्या टाेळीतील पाच जणांना अटक, ७४ लाखांचा मुद्देमाल जप्त
By राजकुमार जोंधळे | Published: October 14, 2023 07:38 PM2023-10-14T19:38:15+5:302023-10-14T19:40:01+5:30
Latur News: लातूर येथील माेबाइल दुकान फाेडून १ काेटी ३५ लाखांचे माेबाइल चाेरणाऱ्या टाेळीतील पाच जणांच्या पाेलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून ७४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
- राजकुमार जाेंधळे
लातूर - येथील माेबाइल दुकान फाेडून १ काेटी ३५ लाखांचे माेबाइल चाेरणाऱ्या टाेळीतील पाच जणांच्या पाेलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून ७४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लातुरातील चैनसुख राेडवरील बालाजी टेलिकॉम माेबाइल दुकान फाेडून, विविध कंपन्यांचे माेबाइल, टॅब, स्मार्ट वॉच, जुने माेबाइल, रोख रक्कम असा १ कोटी ३४ लाख ३७ हजार ७५५ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना २८ ऑगस्टराेजी पहाटे घडली हाेती. याच्या तपासासाठी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेश दिले. अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, लातूर डीवायएसपी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. संजीवन मिरकले, गांधी चौक ठाण्याचे पो.नि. प्रेमप्रकाश माकोडे यांच्या पथकांना सूचना देण्यात आल्या. याबाबत खबऱ्यांनी पाेलिसांना माहिती दिली.
पाचही आराेपी नाशिक जिल्ह्यातील मालेगावचे...
माेबाइल दुकान मालेगाव (जि. नाशिक) येथील आंतरराज्य गुन्हेगारांच्या टाेळीने फाेडल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या अटकेसाठी धुळे, मालेगाव, नाशिक, गुजरातमधील अहमदाबाद, सुरत, वडोदरा शहरात पथके तैनात झाली. अखेर अकबरखान हबीबखान पठाण (३७), खैसरखान हबीबखान पठाण (२२), मंहमद अहमद उर्फ कल्लू असलम अंसारी (२२), झिब्राईल उर्फ जीब्बो इस्माईल अन्सारी (२०) आणि आमिनखान इस्माईल अन्सारी (२२, रा. मालेगाव जि. नाशिक) यांना अटक केली. त्यांच्याकडून १९५ माेबाइल, १० स्मार्ट वॉच, ०६ टॅब असा ७४ लाखांचा मुद्देमाल, कार असा मुद्देम जप्त केला. तपास सपोनि. नौशाद पठाण करत आहेत.
राज्यभरातील विविध शहरात २४ गुन्हे दाखल...
सराईत टाेळीतील गुन्हेगारांवर महाराष्ट्र राज्यात नंदुरबार, नाशिक, अकोला, परभणी, धुळे, नांदेड, धाराशिव, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यात जवळपास २४ गुन्ह्यांची नाेंद आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातही या टाेळीविराेधात गुन्हे दाखल आहेत. - साेमय मुंडे, पाेलिस अधीक्षक, लातूर
या पाेलिस पथकांनी केली गुन्ह्याची उकल...
ही कारवाई सपोनि. व्यंकटेश आलेवार, प्रवीण राठोड, पोउपनि. निखिल पवार, आक्रम मोमीन, खुर्रम काझी, राजेंद्र टेकाळे, दामोदर मुळे, रवी गोंदकर, राहुल सोनकांबळे, राम गवारे, राजेश कंचे, यशपाल कांबळे, माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, तुराब पठाण, राजू मस्के, राहुल कांबळे, संतोष खांडेकर, मनोज खोसे, चंद्रकांत केंद्रे, नकुल पाटील, दयानंद आरदवाड, रणवीर देशमुख, दत्तात्रय शिंदे, भाऊसाहेब मंतलवाड, दयानंद सारोळे, अभिमन्यू सोनटक्के, नंदकिशोर शेंडगे, महेश पारडे, शिवाजी पाटील, विनोद चलवाड, महादेव मामडगे, विष्णू पंडगे, परमेश्वर स्वामी, सायबर सेलचे पो.नि. अशोक बेले, पोनि. गावंडे, संतोष देवडे, गणेश साठे, शैलेश सुडे, अंजली गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.