Latur: वाहनांच्या मूळ पासिंगमध्ये छेडछाड करणारी टाेळी पाेलिसांच्या जाळ्यात, ९ जणांना अटक
By राजकुमार जोंधळे | Published: September 16, 2023 05:28 AM2023-09-16T05:28:30+5:302023-09-16T05:28:47+5:30
Latur Crime News: वाहनांच्या मूळ पासिंग, चेसी क्रमांकात छेडाछाड करून, भंगारातील वाहनांचे क्रमांक टाकून बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या टाेळीतील नऊजणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने अटक करण्यात आली आहे.
- राजकुमार जाेंधळे
लातूर - वाहनांच्या मूळ पासिंग, चेसी क्रमांकात छेडाछाड करून, भंगारातील वाहनांचे क्रमांक टाकून बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या टाेळीतील नऊजणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून विविध कंपन्यांची तब्बल ४२ लाख ५० हजारांची नऊ वाहने जप्त केली आहे. याबाबत किनगाव पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध व्यावसायांवर कारवाईचे आदेश दिले हाेते. स्था.गु.शा.चे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांना खबऱ्याने माहिती दिली. या माहितीनुसार काही व्यक्तींची टोळी परमिट टॅक्सी वाहनच्या मूळ पासिंग नंबर, चेसी क्रमांकात छेडछाड करून भंगारातील वाहनांचे क्रमांक टाकून, अशा वाहनांची बनावट कागपत्र तयार करते. ते वापरात आणून शासनाची फसवणूक करत आहेत. चाैकशीतून बनावट कागदपत्र असलेल्या वाहनांचा सुगावा लागला. ११ पैकी ९ जणांना विविध ठिकाणांहून अटक केली. अटक केलेल्यांत बाबू दत्तात्रय घाटे (रा. चाटेवाडी, ता. अहमदपूर), शेख सरफराज मिर्झा (रा. करीमनगर, नांदेड नाका, लातूर), रौफ जाफर शेख, गोविंद विश्वनाथ वनवे, रामभाऊ ज्ञानोबा वनवे, ज्ञानेश्वर मोहनराव हाणमंते, शाम शिवाजी भोसले, अखील जानीमियाँ शेख (सर्व रा. किनगाव, ता. अहमदपूर), ताजोद्दीन मज्जीदखान पठाण (रा. लातूर) यांचा समावेश आहे. तर पांडुरंग गोविंदराव फड, दत्तूसिंग राजरामसिंग ठाकूर (रा. किनगाव) हे फरार आहेत. तपास पोलिस उपनिरीक्षक तोटेवाड करत आहेत.
ही कारवाई अप्पर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे, लातूर डीवायएसपी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.चे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, राहुल सोनकांबळे, नितीन कठारे, मनोज खोसे, राहुल कांबळे, संतोष खांडेकर, राजेश कंचे यांच्या पथकाने केली.