लातूरला अवकाळी पावसाने झोडपले; टरबूज, पपई, भाजीपाल्याची प्रचंड नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 04:22 PM2020-04-20T16:22:07+5:302020-04-20T16:23:28+5:30
लातूर तालुक्यातील सारसा शिवारात वादळी वारा, गारांचा पाऊस
लातूर : लॉकडाउनमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना निसर्गाच्याही लहरीपणाचा फटका सहन करावा लागत आहे. मुलांप्रमाणे सांभाळ केलेला भाजीपाला, टरबूज, पपई आदी पिके एका रात्रीत होत्याची नव्हती झाली. वादळी वारा वरून गारांचा मार बसल्याने झाडांची पानेही गळून पडली. त्यामुळे लातूर तालुक्यातील सारसा शिवारातील शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
लातूर तालुक्यातील तांदुळजा गादवड टाकळगाव सारसा वांजरखेडा शिवारात रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या आंब्याच्या बनीमीही उडून गेले आहेत शिवाय अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असतानाही कमी पाण्यावर का होईना जोपासलेला भाजीपाला, टरबूज, पपई आदी फळांची नासाडी झाली आहे. रात्रीच्या वेळी झालेल्या वादळी वारा व गारांच्या झपाट्यात उसाची पाने गळून पडली. टरबूजावर गारांचा मारा बसल्याने अतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी मोठी झाडेही उन्मळून पडली आहेत. पहिल्यांदाच एवढे मोठे वादळ आणि गारा पडल्याचे शेतकरी परमेश्वर भिसे, श्रीधर पवार, फक्रोद्दीन सय्यद,जमाल पठाण, महादेव भिसे, सुशील पवार यांनी सांगितले. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली. रात्री झालेल्या वादळात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना मिळताच त्यांनी तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तहसीलदार स्वप्नील पवार यांच्या सूचनेनुसार तलाठी व कृषी सहाय्यक यांनी थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामा सुरू केला असल्याचे मंडळ अधिकारी निजामुद्दीन शेख यांनी सांगितले.
भाजीपाला, फळांचे 5 लाखांचे नुकसान...
सारसा येथील प्रगतशील शेतकरी परमेश्वर भिसे म्हणाले, जवळपास पाच एकर क्षेत्रात पपई, टरबूज, काकडी, वांगे, भेंडी आदी फळे आणि भाजीपाल्याची लागवड केली होती. अगोदरच लॉकडॉउनमुळे लागवडीचा खर्चही निघणे कठीण झाले होते. रविवारी रात्री झालेल्या पावसाने होत्याचे नव्हते झाले. यातून किमान 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
बहरात आलेल्या टरबूजाचा चिखल...
मांजरा नदीकाठी महिनाभरापूर्वी जमाल पठाण, आफसाना शेख यांनी जवळपास दोन एकर क्षेत्रात टरबूज लागवड केली. आणखीन 10 ते 15 दिवसात ते तोडणीला आले असते. लागवड व मशागतीचा आतापर्यंत 70 हजार रुपये खर्च झाला.गारपिटीने रात्रीत सर्वच नुकसान झाले. आता फड मोडल्याशिवाय पर्याय नाही. गारामुळे सर्व टरबूज फुटली आहेत. किमान दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे.
साहेब आमचाही पंचनामा करा...
शिवारात पंचनामा करण्यासाठी गेलेल्या तलाठी, कृषी सहायक यांनी नुकसानीची पाहणी करीत पंचनामा केला. गारपीटीत उसाचेही मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही पंचनाम्यासाठी महसुलाच्या कर्मचाऱ्यांना विनवणी केली. शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.