Latur: बेकायदा बैलांच्या झुंजी लावणं अंगलट; २४ ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा दाखल, लातूर जिल्ह्यातील घटना
By राजकुमार जोंधळे | Published: November 15, 2023 11:48 PM2023-11-15T23:48:22+5:302023-11-15T23:48:44+5:30
Latur News: बेकायदा बैलांच्या झुंजी लावणे कोराळी (त. निलंगा) गावकऱ्यांच्या चांगलेच अंगलट आले असून, याबाबत कासार शिरसी पोलिस ठाण्यात २४ ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- राजकुमार जोंधळे
लातूर - बेकायदा बैलांच्या झुंजी लावणे कोराळी (त. निलंगा) गावकऱ्यांच्या चांगलेच अंगलट आले असून, याबाबत कासार शिरसी पोलिस ठाण्यात २४ ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सागितले, निलंगा तालुक्यातील कोराळी येथे गावकऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून बैलांच्या झुंजी लावल्या. अशा झुंजी लावणे हे बेकादेशीर असून, याबाबत न्यायालयाने थेट बंदी घतली आहे. मात्र, हा बंदी आदेश डावलून कोराळी शिवारात ग्रामस्थांनी बैलांच्या झुंजी लावल्या. याबाबतचे चित्रीकरण गावातील उत्साही कार्यकर्त्यानी केले. त्यानंतर झुंजीच्या फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केले. या फोटो आणि व्हिडिओने बेकायदा झुंजीचा प्रकार समोर आला. पोलिसांनी हा व्हिडिओ पाहून, त्यात कैद झालेल्या ग्रामस्थांची यादी करून कारवाईला सुरुवात केली. या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेतली.
याबाबत कासार सिरसी पोलिस ठाण्यात एकूण २४ ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदा अशा प्राण्याच्या झुंजी कोणी लावल्या, त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.