Latur: मृतावस्थेत आढळला माेर; मात्र, ठसे बिबट्याचे नाहीत, रेणापूर तालुक्यातील घटना
By राजकुमार जोंधळे | Updated: December 17, 2024 22:42 IST2024-12-17T22:42:43+5:302024-12-17T22:42:50+5:30
Latur News: भंडारवाडी (ता. रेणापूर) शिवारात अर्धवट खालेला माेर, तेथे आढळलेल्या ठशांची वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी, वनरक्षकांनी मंगळवारी पाहणी केली. पंचनामाही केला आहे.

Latur: मृतावस्थेत आढळला माेर; मात्र, ठसे बिबट्याचे नाहीत, रेणापूर तालुक्यातील घटना
- राजकुमार जाेंधळे
लातूर - भंडारवाडी (ता. रेणापूर) शिवारात अर्धवट खालेला माेर, तेथे आढळलेल्या ठशांची वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी, वनरक्षकांनी मंगळवारी पाहणी केली. पंचनामाही केला आहे. मात्र, आढळून आलेले ठसे हे बिबट्याचे नसल्याचे स्पष्टीकरण रेणापूर तालुका वनपरिमंडळाधिकारी पी. टी. देवकरण यांनी दिले आहे.
भंडारवाडी शिवारात सोमवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास रेणा मध्यम प्रकल्पाच्या खालील बाजूस तुकाराम मामडगे यांच्या शेतात बिबट्या दिसल्याचे एका शेतकऱ्याने गावात येऊन मंगळवारी सकाळी सांगितले. या माहितीनंतर गावातील तरुण मंडळींनी मंगळवारी घटनास्थळी भेट दिली असता, तेथे अर्धवट खालेला मोर आणि ठसे दिसून आले. या ठशांचे त्यांनी छायाचित्र काढले. या घटनेची गावात मोठी चर्चा झाली. परिणामी, भंडारवाडी परिसरात शेतकऱ्यांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती आमदार रमेश कराड यांना देण्यात आली. त्यांनी नागपूर येथून तातडीने जिल्हा वनपरिक्षेत्र अधिकारी पोटे यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला. तातडीने स्थळपाहणी करून उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यानंतर रेणापूर तालुका वनपरिमंडळाधिकारी पी. टी. देवकरण यांच्यासह वनरक्षक टी. ए. डिगोळे, बी. के. मुंडे, सतीश कांबळे, विठोबा शिंदे हे घटनास्थळी मंगळवारी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून पंचनामा केला. ठसे अस्पष्ट असल्याचे दिसून आले. हे ठसे बिबट्याचे नसल्याची खात्री पटली. अर्धवट खालेला मोर वनाधिकाऱ्यांनी रेणापूर येथे घेऊन गेला आणि त्याची उत्तरीय तपासणी केली.
बिबट्याचे ठसे नाहीत; शेतकऱ्यांनी घाबरू नये...
भंडारवाडी शिवारातील घटनास्थळी मंगळवारी आम्ही भेट देऊन पाहणी केली असून, रेणापूर तालुक्यात पाच ते सहा ठिकाणी बिबट्या असल्याची माहिती मिळाली. तेथेही आम्ही भेटी देत पाहणी केली आहे. मात्र, कुठेही आम्हाला बिबट्याची ठसे आढळून आले नाहीत.
- पी. टी. देवकरण, परिमंडळाधिकारी, रेणापूर
बिबट्याची दशहत; शेतकऱ्यांमध्ये चिंता...
भंडारवाडी परिसरात बिबट्या आढळल्याचे शेतकऱ्यांनी संतोष नागरगोजे यांना कळविले. त्यांनी याबाबत वनविभागाचे अधिकारी, तलाठी, शेतकऱ्यांना सोबत घेत त्या शेतकऱ्याची भेट घेतली. शेतकऱ्यांना सावध राहण्याबाबत सूचना केल्या. यावेळी शेतकरी म्हणाले, आम्ही रोज जीव मुठीत घेऊन शेतात पाणी देत आहाेत. आम्हाला रात्रीऐवजी दिवसा वीज द्यावी, अशी मागणी केली आहे. सध्याला बिबट्याची दशहत असून, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता आहे.