सोयाबीन संशोधन केंद्रासाठी लातूरचा आडत बाजार कडकडीत बंद
By हणमंत गायकवाड | Published: September 22, 2023 05:17 PM2023-09-22T17:17:41+5:302023-09-22T17:17:52+5:30
लातूर जिल्हा गेल्या दोन दशकांपासून सोयाबीन हब म्हणून ओळखला जातो.
लातूर : सोयाबीन संशोधन केंद्र लातूर येथे स्थापन करावे, या प्रमुख मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने गुरुवारी लातूर बाजार समिती मधील व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला. शिवसेना सहसंपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली लातूर बाजार समितीमधील सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून निदर्शने करण्यात आली. आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
लातूर जिल्हा गेल्या दोन दशकांपासून सोयाबीन हब म्हणून ओळखला जातो. लातूर येथे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना सोयाबीन परिषद झाली होती. त्यात तत्कालीन कृषिमंत्री दादा भुसे यांनी सोयाबीन संशोधन केंद्र लातूर येथे करण्याचे जाहीर केले होते. परंतु १६ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत परळी येथे सोयाबीन संशोधन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याच्या निषेधार्थ तसेच लातूर येथे सोयाबीन संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी पुनर्विचार करावा या मागणीसाठी गुरुवारी लातूर बाजार समितीचे सर्व व्यवहार बंद ठेवून विरोध नोंदवला. या आंदोलनास महाराष्ट्र राज्य बाजार समिती उपसभापती संतोष सोमवंशी, माजी जिल्हाप्रमुख नामदेव चाळक, महानगर प्रमुख विष्णुपंत साठे, युवासेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, शहर प्रमुख रमेश माळी, संचालक बालाप्रसाद बिदादा, सुधीर गोजमगुंडे, शिवाजी कांबळे , आडत व्यापारी अध्यक्ष चंद्रकांत पाटील, गुमास्ता अध्यक्ष तुळशीराम गंभिरे , त्र्यंबक स्वामी , रमेश पाटील, शंकर रांजनकर, बसवराज मंगरूळे,शिवकुमार तोंडारे,श्रीराम कुलकर्णी, अनंत जगताप, विलास लंगर,अजित सोमवंशी,राहुल रोडे, भास्कर माने, तानाजी करपुरे, सिद्धेश्वर जाधव , सुधाकर कुलकर्णी, राजेंद्र कतारे, बालाजी जाधव, अंजीरराव धानुरे,अमर पवार व आडत, व्यापारी, गुमास्ता, हमाल, व गाडीवान, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.