मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे २४ तास डॉक्टरांच्या निगरणीत; सध्या प्रकृती स्थिर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 18:03 IST2025-04-09T17:59:48+5:302025-04-09T18:03:05+5:30
मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे २४ तास डॉक्टरांच्या निगरणीत; सध्या प्रकृती स्थिर
लातूर : महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांना सोमवारी एअर ॲम्ब्युलन्सने मुंबई येथील कोकिळाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉ. अभयकुमार यांच्या नियंत्रणात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही आवश्यक चाचण्या पूर्ण केल्या असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांना तात्काळ लातूर येथील सह्याद्री रुग्णालयात शनिवारी दाखल करण्यात आले होते. यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना सोमवारी मुंबईला हलविण्यात आले. कोकिळाबेन रुग्णालयात आता उपचार सुरू आहेत. यापूर्वी करण्यात आलेले उपचार व तपासण्यांची पडताळणी झाली असून, २४ तास त्यांच्यावर डॉक्टरांची टीम नजर ठेवून आहे. मंगळवारी सकाळी डॉ. अभयकुमार यांच्या टीमने त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली. मनपाचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ. शंकर भारती, तसेच सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. सुनील होळीकर तेथे उपस्थित असल्याचे सांगण्यात आले.