होर्डिंगधारकांना लातूर मनपाची डेडलाइन; गुन्हे दाखल करणार...
By हणमंत गायकवाड | Published: May 18, 2024 04:17 PM2024-05-18T16:17:38+5:302024-05-18T16:17:57+5:30
सार्वजनिक मालमत्तांवर लावण्यात आलेले होर्डिंग तत्काळ काढून घेण्याचेही निर्देश दिले असून, होर्डिंग नाही काढले तर मनपाकडून ते काढले जातील.
लातूर: शहरात ठिकठिकाणी अवैध होर्डिंग लावण्यात आले आहेत. होर्डिंग १९ मे पर्यंत काढून घ्यावेत. अन्यथा मनपाच्या वतीने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई येथील घाटकोपर घटनेवरून दक्षता घेण्यात आली आहे. ज्या खाजगी मालमत्तांवर मोठमोठे होर्डिंग आहेत, ते होर्डिंग १९ मेपर्यंत स्ट्रक्चरसहित काढून घ्यावेत. २० मे रोजी असे होर्डिंग दिसून आले, तर मालमत्ताधारकांवर, एजन्सीवर क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
सार्वजनिक मालमत्तांवर लावण्यात आलेले होर्डिंग तत्काळ काढून घेण्याचेही निर्देश दिले असून, होर्डिंग नाही काढले तर मनपाकडून ते काढले जातील. त्यासाठी होणारा खर्च एजन्सीकडून वसूल केला जाईल. शिवाय, त्या एजन्सीवर गुन्हे दाखल केले जातील. जाहिरात एजन्सींनी परवाना नूतनीकरणासाठी प्रस्ताव दाखल केलेले आहेत. त्यात त्रुटी असल्यामुळे असे प्रस्ताव निकाली काढण्यात आली आहेत. सद्य:स्थितीत महापालिकेकडे एकही प्रस्ताव नाही. शुल्क भरल्याच्या पावत्या सादर केल्या आहेत; परंतु त्या पावत्या जुन्या आहेत. परवान्याचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही.
परवाना हवा असेल तर या अटींची पूर्तता करा...
शहरात होर्डिंग्ज उभे करायचे असतील तर त्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. ज्या व्यावसायिकांना होर्डिंगसाठी परवानगी आवश्यक आहे, त्यांनी जागा मालकाचे बांधकाम परवाना, बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र, शंभर रुपयांच्या बाँडवर संमतीपत्र, जागा मालकाने चालू वर्षाचा कर भरल्याची पावती, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट, होर्डिंगचे स्टील डिझाइन रिपोर्ट, मनपा क्षेत्रीय अधिकारी व क्षेत्रीय अभियंत्यांचा अहवाल, बेबाकी प्रमाणपत्र सादर करून परवाना घ्यावा लागेल.
१६ होर्डिंग्ज काढले; दोन गुन्हे...
गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये १६ होर्डिंग्ज काढले असून, क्षेत्रीय कार्यालयामार्फत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती मनपा उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांनी दिली.