लातूर नीट प्रकरण: संजय जाधवला १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी, सीबीआयकडून तपास
By राजकुमार जोंधळे | Published: July 9, 2024 01:04 AM2024-07-09T01:04:46+5:302024-07-09T01:05:03+5:30
संजय जाधव याला साेमवारी लातूर न्यायालात हजर करण्यात आले होते
राजकुमार जाेंधळे, लातूर: नीट (नॅशनल एलिजिबिलिटी एंटरन्स टेस्ट) गुणवाढीसंदर्भात सीबीआयच्या ताब्यात असलेल्या संजय जाधव याला साेमवारी लातूर न्यायालात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावली.
‘नीट’मध्ये गुणवाढीचे आमिष दाखवून पालक-विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समाेर आला. याबाबत नांदेड एटीएसच्यावतीने देण्यात आलेल्या तक्रारीवरून लातुरातील शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात चाैघांविराेधात २३ जून राेजी रात्री गुन्हा दाखल केला हाेता. संजय जाधव, जलीलखाँ पठाण यास स्थानिक पाेलिसांनी तातडीने अटक केली हाेती. लातूर पाेलिसांनी प्राथमिक तपास केला. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे वर्ग झाला. सीबीआयच्या पथकाने दाेघांचाही ताबा घेतला. यातील जलीलखाँ पठाण याला शनिवारी लातूर न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावली. तर संजय जाधव याच्या सीबीआय काेठडीत दाेन दिवसांची वाढ केली हाेती. दरम्यान, काेठडीची मुदत संपल्याने साेमवारी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावली, अशी माहिती आराेपीचे वकील बळवंत जाधव यांनी दिली.