यशवंत पंचायत राजमध्ये लातूर पंचायत समिती राज्यात प्रथम
By हरी मोकाशे | Published: June 12, 2023 05:24 PM2023-06-12T17:24:31+5:302023-06-12T17:25:08+5:30
यशवंत पंचायत राज अभियानात लातूर जिल्हा परिषदेने यापूर्वी राज्यस्तरावरील चार पारितोषिके मिळविली आहेत.
लातूर : यशवंत पंचायत राज अभियानात लातूरपंचायत समितीने राज्यात प्रथम तर लातूर जिल्हा परिषदेने राज्यात तृतीय क्रमांक मिळविला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर विभागात जिल्ह्यातील जळकोट पंचायत समितीने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. विभाग आणि राज्यात लातूरने आपल्या कार्याचे वैशिष्ट्य कायम ठेवले आहे.
पंचायत राज संस्थांची कार्यक्षमता अधिक वाढावी आणि व्यवस्थापन व विकास कार्यात अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा गौरव व्हावा म्हणून राज्य शासनाच्या वतीने यशवंत पंचायत राज अभियान राबविण्यात येते. या अभियानांतर्गत सन २०२१-२२ मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची तपासणी करण्यात आली होती. यात लातूर जिल्हा परिषद, लातूर आणि जळकोट येथील पंचायत समितीच्या कामकाजाची पाहणी करण्यात आली होती. ४०० गुणांच्या तपासणीत सर्व विभागांचे कामकाज, विकास कामे, लेखा परीक्षण अहवाल, ग्रामपंचायतचे कामकाज, जिल्हा नियोजन समिती व स्वउत्पन्नातून विविध विकास कामे आदींची पाहणी करण्यात आली होती. त्याचा निकाल सोमवारी ग्रामविकास विभागाने जाहीर केला. त्यात लातूर जिल्हा परिषदेने राज्यात तृतीय क्रमांक मिळविला आहे. यवतमाळ जिल्हा परिषद प्रथम तर कोल्हापूर जिल्हा परिषद द्वितीय आली आहे. तसेच पंचायत समिती विभागात लातूर पंचायत समितीने राज्यात प्रथम स्थान पटकाविले. नागपूर जिल्ह्यातील काटोल पंचायत समितीने द्वितीय तर अहमदनगर जिल्ह्यातील राहता पंचायत समितीने तृतीय पारितोषिक मिळविले आहे.
लातूर जिल्हा परिषदेस यापूर्वी राज्यस्तरावर चार बक्षिसे...
यशवंत पंचायत राज अभियानात लातूर जिल्हा परिषदेने यापूर्वी राज्यस्तरावरील चार पारितोषिके मिळविली आहेत. सन २००६-०७ मध्ये प्रथम, सन २०१२-१३ मध्ये प्रथम, सन २०१४- १५ मध्ये द्वितीय, तसेच २०१५-१६ मध्ये पुन्हा प्रथम क्रमांक मिळविला होता. तसेच सन २०१२- १३ मध्ये देश पातळीवरील पंचयत सशक्तीकरणात प्रथम क्रमांक पटकाविला होता. बक्षिसापोटी एकूण १ कोटी ६ लाख ५० हजार मिळाले. आता सहाव्यांदा राज्यात क्रमांक पटकाविला आहे. आता १७ लाखांचे बक्षीस मिळणार आहे.
लातूर पंचायत समितीचा दुहेरी गौरव...
लातूर पंचायत समितीनेही यापूर्वी विभागस्तरावर दोनदा बक्षीस मिळविले आहे. आता तर राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवित लौकिक केला आहे. तसेच ती विभागातही प्रथम आहे. त्यामुळे राज्यस्तरावरील २० लाखांचे आणि विभागस्तरावरील ११ लाखांचे अशी एकूण ३१ लाखांची दोन पारितोषिक लातूर पंचायत समितीस मिळणार आहेत.
सर्वांच्या सहकार्याने यश...
जिल्हा परिषदेचे कार्य पूर्वीपासून उत्कृष्ट आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या विभागात चांगले कार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्काराने आम्हा सर्वांना आणखीन प्रोत्साहन मिळाले आहे.
- नितीन दाताळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.
सर्वांच्या मदतीचे फलित...
लातूर पंचायत समितीतील सर्व विभागांनी चांगले कार्य करण्याबरोबरच ग्रामीण नागरिकांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला. सर्वांच्या सहकार्याचे हे फलित आहे. यापुढेही सीईओंच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवून प्रशासन अधिक गतिमान करु.
- तुकाराम भालके, गटविकास अधिकारी, लातूर.