सीईटीतही लातूर पॅटर्न
By Admin | Published: June 7, 2014 05:51 PM2014-06-07T17:51:48+5:302014-06-07T17:52:28+5:30
लातूर : एमबीबीएस आणि डेन्टलच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी राज्यात घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेत (एमएच-सीईटी) लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयातील देवेश शिळीमकर हा विद्यार्थी
लातूर : एमबीबीएस आणि डेन्टलच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी राज्यात घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेत (एमएच-सीईटी) लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयातील देवेश शिळीमकर हा विद्यार्थी ६७८़२ गुण घेऊन राज्यात प्रथम, तर विपुल जाजू ६६६़२ गुण मिळवून द्वितीय आला आहे़ याशिवाय याच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एसटी, व्हीजे व एनटी या प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला़
वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत ८ मे रोजी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेचा निकाल गुरुवारी रात्री उशिरा संचालनालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. या परीक्षेत मेडिकल, डेन्टल अभ्यासक्रमासाठी ७ हजार ५०६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. राज्यातील ३९० परीक्षा केंद्रांवर १ लाख ४८ हजार ३४९ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ६५ हजार ६०७ मुले आणि ८२ हजार ७८७ विद्यार्थिनींनी ही परीक्षा दिली होती. यापैकी मेडिकल, डेन्टल अभ्यासक्रमांसाठी खुल्या प्रवर्गातून ४ हजार १११ आणि राखीव कोट्यातून ३ हजार ३९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एनटी-३ या प्रवर्गातून लातूरच्या शाहू महाविद्यालयाचा गोविंद आदिनाथ सानप याने ६६० गुण संपादित करीत राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला. वैभव चन्नप्पा पवार ५७०़२ गुण मिळवून व्हीजेएनटी प्रवर्गातून राज्यात प्रथम, राणी विठ्ठल पुजरवाड ५३१ गुण संपादन करीत एसटी प्रवर्गातून राज्यात प्रथम आली आहे़ तर एनटी-३ प्रवर्गातून सुभांगी नारायणराव फड (६९१़२) व सुशील सूर्यकांत गीते (५६२) यांनी राज्यातून अनुक्रमे द्वितीय व चतुर्थ क्रमांक मिळविला आहे़ गुुणपडताळणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना ६ ते ९ जून या काळात अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर १० जून रोजी संचालनालयाच्या संकेतस्थळावर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांकडून ४ केंद्रांवर प्राधान्य अर्ज भरून घेण्यात येणार आहेत.
जुन्या पद्धतीने परीक्षा घ्या
निगेटीव्ह मार्किंग व सीबीएसई परीक्षेच्या धर्तीवर घेण्यात आलेली परीक्षा विद्यार्थ्यांना अवघड गेली. त्यामुळे जुन्या पद्धतीनेच परीक्षा घेण्यात यावी, अशी विनंती राज्य शासनाकडे करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी सांगितले.