नीटमध्ये लातूर पॅटर्नचा दबदबा कायम; तब्बल ४६५ विद्यार्थी सहाशेपार
By संदीप शिंदे | Updated: June 5, 2024 20:19 IST2024-06-05T20:18:38+5:302024-06-05T20:19:02+5:30
लातूरच्या सार्थ पाटील याने ७२० पैकी ७१५ गुण मिळवित देशात २५२ वी रँक मिळविली आहे.

नीटमध्ये लातूर पॅटर्नचा दबदबा कायम; तब्बल ४६५ विद्यार्थी सहाशेपार
लातूर : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत यंदाही लातूर पॅटर्नचा दबदबा कायम राहिला आहे. शहरातील विविध महाविद्यालयातील ४६५ विद्यार्थ्यांनी ६०० पेक्षा अधिक गुण मिळवित वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग सुकर केला आहे. विशेष म्हणजे राजर्षी शाहू महाविद्यालयातील सार्थ पाटील याने ७२० पैकी ७१५ गुण मिळवित देशात २५२ वी रँक मिळविली आहे.
नॅशनल टेस्टींग एजन्सीने मंगळवारी सायंकाळी नीट परीक्षेचा निकाल जाहीर केला. दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही परीक्षेत लातूर पॅटर्नने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. राजर्षी शाहू महाविद्यालयातील १४ विद्यार्थ्यांना ७०० पेक्षा अधिक गुण मिळाले असून, ४१४ विद्यार्थ्यांनी ६०० पेक्षा अधिक गुण घेतले आहेत. यामध्ये शिवम अग्रवाल (७१०), मनस्वी मस्के (७०७) यांचा समावेश आहे. दयानंद विज्ञान महाविद्यालयातील १५ विद्यार्थ्यांनी ६०० पेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. श्री. त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील २२ विद्यार्थ्यांना ६०० पेक्षा अधिक गुण असून, ओजस गुंडेचा ७०० गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम आला आहे. तसेच महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, जयक्रांती महाविद्यालय, चंद्रभानु सोनवणे महाविद्यालय, परिमल महाविद्यालयानेही नीट परीक्षेत यशाची परंपरा कायम राखली आहे.