लातूर पाेलिस भरती प्रक्रिया : तीन दिवस हाेणार ४३१ पात्र उमेदवारांची काैशल्य चाचणी
By राजकुमार जोंधळे | Published: July 4, 2024 01:05 AM2024-07-04T01:05:37+5:302024-07-04T01:06:09+5:30
गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध...
लातूर : जिल्हा पाेलिस दलातील रिक्त असलेल्या जागांसाठी भरती प्रक्रिया पार पाडली जात आहे. यामध्ये प्रवर्गनिहाय पाेलिस शिपाई - ३९, पाेलिस शिपाई बँड्समन - ५ आणि पाेलिस शिपाई चालक - २० पदांसाठी पहिल्या टप्प्यात उमेदवारांची शारीरिक माेजमाप, मैदानी चाचणी १९ ते २८ जून या काळात बाभळगाव पाेलिस मुख्यालयाच्या मैदानावर घेण्यात आली.
मैदानी चाचणीसाठी हजर राहिलेल्या उमेदवारात पात्र ठरलेल्या उमेदवारांना आता काैशल्य चाचणीसाठी बाेलावण्यात येत आहे. याबाबतची पात्र गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. चालक, पाेलिस शिपाई पदासाठी शारीरिक माेजमाप व शारीरिक मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेले उमेदवार वाहन चालविण्याच्या काैशल्य चाचणीसाठी पात्र ठरले आहेत. त्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिवाय, पाेलिस अधीक्षक कार्यालयात दर्शनी भागावर डकविण्यात आली आहे. ४ जुलै राेजी १२० उमेदवार, ५ जुलै राेजी १५५ आणि ६ जुलै राेजी १५६ उमेदवारांना बाेलाविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी बुधवारी दिली.