Latur: पाेलिस पथक गावात धडकले; गुंगारा देत आराेपी पसार झाले, ३० ताेळ्यांचे दागिने जप्त
By राजकुमार जोंधळे | Updated: December 17, 2024 22:32 IST2024-12-17T22:31:58+5:302024-12-17T22:32:29+5:30
Latur Crime News: शहरातील एमआयडीसीत एका मंगल कार्यालयात साखरपुड्याच्या कार्यक्रमातून ३० ताेळे दागिन्यांची बॅग आंतरराज्य टाेळीने लंपास केली हाेती. त्यांचा पाेलिसांना सुगावा लागला. ही बॅग एका पाहुण्याच्या घरी लपवल्याची माहिती मिळाली.

Latur: पाेलिस पथक गावात धडकले; गुंगारा देत आराेपी पसार झाले, ३० ताेळ्यांचे दागिने जप्त
- राजकुमार जाेंधळे
लातूर - शहरातील एमआयडीसीत एका मंगल कार्यालयात साखरपुड्याच्या कार्यक्रमातून ३० ताेळे दागिन्यांची बॅग आंतरराज्य टाेळीने लंपास केली हाेती. त्यांचा पाेलिसांना सुगावा लागला. ही बॅग एका पाहुण्याच्या घरी लपवल्याची माहिती मिळाली. तेथे छापा मारून पाेलिसांनी ३० ताेळे साेने जप्त केले आहे. ‘त्या’ पाहुण्याच्या गावात पाेलिस धडकले...अट्टल गुन्हेगार मात्र गुंगारा देत पसार झाले.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील एमआयडीसी ठाण्याच्या हद्दीतील मंगल कार्यालयात साखरपुड्याची धामधूम सुरू हाेती. यावेळी अज्ञातांनी दागिन्यांची बॅग पळविली. पाेलिसांकडून जिल्हा, राज्यासह परराज्यांतील रेकाॅर्डवरील गुन्हेगारांची माहिती एकत्रित केली. त्यातच खबऱ्यानेही माहिती दिली. दागिने चोरणारी टाेळी मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील बोडा गावाची असल्याची माहिती समाेर आली. याची खातरजमा केली असता, ती खरी असल्याचे समाेर आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मध्य प्रदेशातील गावाकडे रवाना झाले.
मध्य प्रदेशात आठ दिवसांचा मुक्काम अन् दाेन हजार किलाेमीटरचा प्रवास...
लातूर ते मध्य प्रदेशातील राजगड असा तब्बल दोन हजार किलोमीटरचा प्रवास पाेलिसांनी केला. मध्य प्रदेशात आठ दिवस त्यांनी मुक्काम ठाेकला. याच मुक्कामात त्यांनी आरोपींचा शोध लावला. चोरलेल्या मुद्देमालाबाबत अचूक व सखोल माहिती मिळवली.
नातेवाईक महिलेच्या घरी ‘ती’ साेन्याची बॅग लपविली...
सोनू गोकुळप्रसाद सिसोदिया (वय २०), मेहताब नथूसिंग सिसोदिया (२५, दाेघही रा. हुलखेडी, ता पाचोर, जि. राजगड, मध्य प्रदेश) आणि कालू बनवारी सिसोदिया (२०, रा. कडिया, ता. पाचोरा, जि. राजगड, मध्य प्रदेश) यांनी साखरपुड्याच्या कार्यक्रमातून ३० तोळे सोन्याची बॅग चोरून ती एका नातेवाईक महिलेकडे ठेवल्याचे समजले. या महिलेकडून ३० तोळे दागिन्याची बॅग पाेलिसांनी जप्त केली.
पाेलिसांचा सुगावा; तीन आराेपी पळाले...
लातूरचे पोलिस पथक गावात दाखल झाल्याचा सुगावा लागताच टाेळीतील तीन सराईत चाेरटे पसार झाले. त्यांच्या मागावर पाेलिस पथक असून, शोध घेतला जात आहे. शिवाय, गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल एमआयडीसी पाेलिस ठाण्याकडे जमा करण्यात आला आहे. अधिक तपास एमआयडीसी पाेलिस ठाण्याचे पोउपनि. राजपूत हे करीत आहेत.
लातूर येथील पाेलिस पथकाने केली कारवाई...
जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी तपासाचे आदेश दिले. अपर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि. संजीवन मिरकले, सपोनि. विश्वंभर पल्लेवाड, राहुल सोनकांबळे, खुर्रम काझी, युवराज गिरी, मुन्ना मदने, विकास नळेगावकर, राजेश कंचे, मोहन सुरवसे, सायबर सेलचे पोलिस उपनिरीक्षक हीना शेख, संतोष देवडे, गणेश साठे, शैलेश सुळे यांच्या पथकाने केली आहे.