लातूर : क्लास संचालकाच्या हत्येप्रकरणी पाच जण गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 03:04 PM2018-06-26T15:04:25+5:302018-06-26T15:06:32+5:30
खासगी क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या हत्येप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
लातूर - खासगी क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या हत्येप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी प्रा. चंदनकुमार छोटेलाल शर्मा (35 रा. कुमार मॅथस् लातूर संचालक) यांच्यासहीत अक्षय भिवा शेंडगे (21), शरद सूर्यकांत घुमे (29 ), करण चंद्रपालसिंग गहिरवार (26 ) आणि महेशचंद्र प्रभाकरराव गोडगे) या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
अविनाश चव्हाण यांची हत्या करण्यासाठी 20 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. तर 10 लाख रुपये मारेक-याला देण्यात आले होते. हत्या करण्यासाठी देशी पिस्टलचा गुन्ह्यात वापर आल्याची माहिती समोर आली आहे. गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले रोख 2 लाख 31 हजार रुपये, 13 जिवंत काडतुसे आणि एक मॅगझीन व एक पिस्टल, दुचाकी असा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक शिवाजीराव राठोड यांनी दिली.
नेमके काय आहे प्रकरण?
‘स्टेप बाय स्टेप’ कोचिंग क्लासचे संचालक अविनाश बाबुराव चव्हाण यांची रविवारी (24 जून) मध्यरात्री मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. हा थरार उच्चभ्रू वसाहत असलेल्या महसूल कॉलनीतील मुख्य रस्त्यावर घडला. अविनाश चव्हाण (वय ३६) यांनी शिक्षकांची नेमणूक करून स्टेप बाय स्टेप हा कोचिंग क्लास लातूर येथे सुरु केला होता. दरम्यान, रविवारी रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या साईधाम येथील घराकडे कारने एकटेच निघाले होते. अगदी घराच्या जवळ महसूल कॉलनीतील शाळेजवळ रस्त्यावरच अज्ञात मारेक-यांनी त्यांना गाठले व दोन गोळ्या झाडल्या. पहिला वार निकामी गेला. मात्र दुसरी गोळी अविनाश चव्हाण यांच्या छातीत घुसली. त्यात चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.