शिंदेंच्या मंत्रिमंडळात लातूरला पुन्हा कॅबिनेट मंत्रिपद ? निलंगेकर की पवार याची उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 05:53 PM2022-07-02T17:53:39+5:302022-07-02T17:54:24+5:30

- धर्मराज हल्लाळे लातूर : नव्याने सत्तारूढ झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात लातूरला कॅबिनेट मंत्रिपद निश्चित मिळेल, असा ...

Latur re-appointed as cabinet minister in Shinde's cabinet? Curiosity about Nilangekar or Pawar | शिंदेंच्या मंत्रिमंडळात लातूरला पुन्हा कॅबिनेट मंत्रिपद ? निलंगेकर की पवार याची उत्सुकता

शिंदेंच्या मंत्रिमंडळात लातूरला पुन्हा कॅबिनेट मंत्रिपद ? निलंगेकर की पवार याची उत्सुकता

googlenewsNext

- धर्मराज हल्लाळे
लातूर :
नव्याने सत्तारूढ झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात लातूरला कॅबिनेट मंत्रिपद निश्चित मिळेल, असा दावा राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. आघाडी सरकारमध्ये एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद जिल्ह्याला मिळाले होते. आता नव्या सरकारमध्ये किती मंत्रिपदे येतील, याची उत्सुकता आहे.

भाजपचे आ. संभाजी पाटील-निलंगेकर व आ. अभिमन्यू पवार हे दोन आमदार जिल्ह्यातून निवडून गेले आहेत, तर आ. रमेश कराड विधानपरिषदेवर आहेत. दरम्यान, माजी मंत्री आ. निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली लातूर महानगरपालिका, तसेच जिल्हा परिषदेत भाजपची एकहाती सत्ता आली होती. आता या दोन्ही संस्थेचा कार्यकाळ संपलेला आहे. आ. निलंगेकर यांनी फडणवीस सरकारमध्ये कामगार कल्याण, कौशल्य विकास, माजी सैनिक आणि भूकंप पुनर्वसन मंत्रिपदाचा कारभार सांभाळला होता. ते जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते. त्यामुळे नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारमध्ये त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ निश्चित पडेल, अशी शक्यता आहे. 

याशिवाय पहिल्यांदाच निवडून आलेले अभिमन्यू पवार हे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात. त्यांच्याही गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल, अशी चर्चा औसा विधानसभा मतदारसंघात आहे. तसे झाले तर पवार यांच्या रूपाने औसा मतदारसंघाला सहा वर्षांनंतर पुन्हा मंत्रिपद मिळेल. शिवाय, भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि विधान परिषदेवर निवडून गेलेले आ. कराड यांच्या समर्थकांनाही मंत्रिपदाची अपेक्षा आहे. जिल्हा परिषद भाजपकडे, महापालिका पहिल्या टप्प्यात भाजपकडे, नंतर काँग्रेसकडे अशी राजकीय स्थिती असून, काँग्रेस, राष्ट्रवादीला आव्हान देण्यासाठी जिल्ह्याला मंत्रिपद मिळेल, असा ठाम विश्वास भाजपच्या गोटातून व्यक्त होत आहे.

Web Title: Latur re-appointed as cabinet minister in Shinde's cabinet? Curiosity about Nilangekar or Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.