लातुरच्या रेणा मध्यम प्रकल्पात आठ दिवसात २१ टक्के पाणीसाठा वाढला
By आशपाक पठाण | Published: June 18, 2024 07:38 PM2024-06-18T19:38:08+5:302024-06-18T19:38:28+5:30
पावसाचा परिणाम; घनसरगाव, खरोळा, खरोळा, पोहरेगाव बॅरेजेसच्या पाण्यात वाढ
लातूर : मागील आठ दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे रेणा मध्यम प्रकल्पात तब्बल २१ टक्के जलसाठ्यात वाढ झाली असून मध्यम प्रकल्पामध्ये २२.४९ जलसाठा झाला आहे. जलसाठा वाढल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असून यांचा सिंचनासाठी फायदा होणार आहे. शिवाय, घनसरगाव, रेणापूर, खरोळा, पोहरेगाव सह इतर बॅरेजेस मध्ये जलसाठा झाला आहे.
रेणापूर तालुक्यातील अनेक गावांची तहान भागवणारा प्रकल्प म्हणून रेणा मध्यम प्रकल्पाची ओळख आहे. शिवाय, सिंचनासाठी हजारो शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी मदत होते. पाणीपुरवठा योजनेसाठी वरदान असलेल्या रेणा मध्यम प्रकल्पात ७ जूनपर्यंत केवळ १.५ टक्का जलसाठा होता. गतवर्षी संपूर्ण पावसाळ्यात तसेच परतीचा पाऊस पडला नाही. त्यामुळे प्रकल्पात पाणीसाठा अत्यल्प होता. पाणी कमी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हे पाणी पिण्यासाठी आरक्षित केले होते. शिवाय, उन्हाळ्यात पाणीपुरवठा योजनेसाठी पाणी उपसा झाल्याने या प्रकल्पात पाणीसाठा कमी झाला होता. मात्र, मागील आठ दिवसांपासून तालुक्यात दररोज पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी जलसाठे वाढले आहेत.
पावसामुळे वाढत गेला जलसाठा...
रेणा मध्यम प्रकल्प १० जून २ टक्के पाणीसाठा वाढल्याने ३.४० टक्के पाणी होता. ११ जून रोजी दिवसभर पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात राहिल्याने एक दिवसात तब्बल १६ टक्क्यांनी पाणी वाढले. परिणामी एकूण पाणीसाठा ५.१६८ द.लघमी इतका झाला. तर पाण्याची टक्केवारी १९.६५ झाली. १२ जून रोजी २ टक्के वाढ झाली असून त्यानंतर १८ जूनपर्यंत पाण्याची आवक कमी अधिक प्रमाणात सुरू होती. सध्या प्रकल्पात २२.४९ टक्के पाणीसाठा आहे. उपयुक्त पाणीसाठा ४.६२४ दलघमी तर मृत पाणीसाठा १.१२९ दलघमी झाला आहे.
प्रकल्प क्षेत्रात दमदार पाऊस...
मागील ८ ते १० दिवसांमध्ये रेणा मध्यम प्रकल्पाच्या क्षेत्र परिसरात मोठा पाऊस पडल्यामुळे पाण्याची आवक वाढली आहे. सध्या प्रकल्पात २२.४९ टक्के पाणीसाठा आहे. जलसाठा वाढल्यामुळे शेतकरी व परिसरातील नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावांना वाढीव जलसाठ्याचा लाभ होणार असल्याचे रेणा प्रकल्पाचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी सांगितले.