लातूरमध्ये आरटीओची २० दिवसात ३३४ वाहनांवर कारवाई; २१ लाखांचा दंड केला वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 07:15 PM2018-07-23T19:15:06+5:302018-07-23T19:16:35+5:30
अवैद्य प्रवासी वाहतूक, ओव्हरलोड रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने जुलैच्या पहिल्या दिवसापासूनच कारवाई मोहिम हाती घेतली़ आहे.
- आशपाक पठाण
लातूर : अवैद्य प्रवासी वाहतूक, ओव्हरलोड रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने जुलैच्या पहिल्या दिवसापासूनच कारवाई मोहिम हाती घेतली़ त्यानुसार २० दिवसात जिल्हाभरात भरारी पथकाच्या माध्यमातून ३३४ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, तब्बल २१ लाख ३४ हजार २१८ रूपये दंडही वसूल करण्यात आला आहे़ दरम्यान, दंडात्मक कारवाई करणाऱ्या पथकाने दुचाकीच्या बुलेट फटाका (आवाज) याकडेही लक्ष देण्याची गरज आहे़
नविन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर आरटीओच्या पथकाने पहिल्यांदाच स्कूलबस कडेही विशेष लक्ष घातले़ क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी, स्कूलबसचा परवाना नसणे, शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार निर्मिती, यासह कागदपत्रांची तपासणी करून दोषी आढळलेल्या तब्बल ४२ स्कूलबसेसवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून ३ लाख ४१ हजार ४१८ रूपये दंड वसूल करण्यात आला़ याशिवाय, अवैद्य प्रवासी वाहतूक करणारी वाहने भरारी पथकाच्या रडारवर होती़ लातूर, अहमदपूर, औसा, निलंगा, उदगीर या मार्गांवर गेल्या अनेक दिवसांपासून अवैद्य प्रवासी वाहतूक बोकाळली आहे़ क्षमतपेक्षा अधिक प्रवासी घेवून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, ७९ वाहनांवर दंडात्मक कारवाई झाली़ त्यांच्याकडून १ लाख ६५० रूपये दंडही वसूल झाला़ याचबरोबर यातील काही वाहनांचे दहा दिवसांसाठी निलंबनही करण्यात आले होते़
जुलै महिन्यात प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाने वाहन तपासणीची मोहिम राबविली़ या मोहिमेत दोषी आढळलेल्या ३३४ वाहनांवर कारवाई झाली़ यात लाखोंचा दंड वसूल झाला असला तरी सर्वसामान्य नागरिकांना सर्वाधिक त्रासदायक ठरणारी वाहने मात्र अद्यापही मोकाट आहेत़ गेल्या काही वर्षांपासून लातूर शहरात दुचाकीचे प्रमाण चांगलेच वाढत आहे़ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह तरूणांमध्ये दुचाकीच्या कर्णकर्कश हॉर्नची क्रेझ वाढत चाललेली आहे़ सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी अनेकदा दुचाकीच्या फटाक्यांचे आवाज धोकादायक ठरत आहेत़
सायलेन्सर आणि बल्बचा वाढला धोका
बाजारात नव्याने आलेल्या अनेक नामांकित कंपन्यांच्या दुचाकीची क्रेज तरूणांमध्ये वाढत आहे़ गल्ली बोळातही बुलेटचे फटाके फुटत असल्याने याचा नाहक त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे़ अशा वाहनांवर ना वाहतूक शाखा कारवाई ते ना आरटीओचे पथक़ दुचाकीत वाहने रूबाबदार असल्याने बहुतांश वेळा याकडे जाणीवपूर्वक डोळझाक केली जाते़ रात्रीच्या वेळी हॅलोजन बल्बमुळे अनेक वाहन धारकांना त्रास होत आहे़ याकडेही मोहिम वळविल्यास सामान्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे़