मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ लातूर कडकडीत बंद; बाजारपेठेत दिवसभर शुकशुकाट
By आशपाक पठाण | Published: February 14, 2024 05:36 PM2024-02-14T17:36:20+5:302024-02-14T17:37:11+5:30
सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सर्व आस्थापना, दुकानदार व काही शाळा, महाविद्यालयांनीही सहभाग घेतला.
लातूर : सगेसोयऱ्यांबाबत कायदा करण्यासाठी विशेष अधिवेशन बाेलावून तो मंजूर करावा, यासाठी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार लातूर शहरासह जिल्ह्यात बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. लातूर शहराची प्रमुख बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईसह इतर भागात दिवसभर शुकशुकाट होता.
मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे, राज्य शासनाने सगेसोयऱ्यांबाबत कायदा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावून त्याला मंजूर करावे, अध्यादेशाचे रूपांतर कायद्यात करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला लातूर शहरात बंद पाळून पाठिंबा देण्यात आला.
शाळा, महाविद्यालयेही बंद...
सकल मराठा समाजाच्यावतीने बुधवारी बंद पुकारण्यात आला होता. याला पाठिंबा दर्शविण्यासाठी लातूर शहरातील काही शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही सकाळी सोडून देण्यात आले. काही शाळांनी दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांना सुटी दिली. शिवाय, मुख्य बाजारपेठ, आडत बाजार, भुसार लाइन, सराफ लाइन, कापड लाइन, हनुमान चौक, गंजगोलाई, महात्मा गांधी चौक, राजीव गांधी चौक, बार्शी रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आदी भागात दिवसभर शुकशुकाट होता. सायंकाळी ५ वाजेनंतर शहरात नागरिकांची काहीअंशी वर्दळ सुरू झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन...
लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येऊन सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी घोषणाबाजी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येऊन समाजबांधवांनी बंदचे आवाहन केले. यास प्रतिसाद देत शहरातील व्यापारी, शाळा, दुकाने आदी आस्थापनांनी उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभाग घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.
चौका-चौकात पोलिस बंदोबस्त...
सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सर्व आस्थापना, दुकानदार व काही शाळा, महाविद्यालयांनीही सहभाग घेतला. मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या मागण्या राज्य शासनाने तत्काळ मार्गी लावाव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली. बंदला काही गालबोट लागू नये, यासाठी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवीन रेणापूर नाका, जुना नाका, राजीव गांधी चौक, स्वामी विवेकानंद चौक, नंदी स्टॉप, बार्शी रोड, गंजगोलाई, गूळ मार्केट, महात्मा बसवेश्वर चौक आदी भागात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.