Latur: अक्षरओळख नसलेल्या पालकांचा तांड्यावरील मुलगा झाला पीएसआय
By आशपाक पठाण | Published: August 3, 2024 06:46 PM2024-08-03T18:46:14+5:302024-08-03T18:47:23+5:30
Latur News: आई-वडील दोघेही निरक्षर. कोरडवाहू दोन एकर जमीन. त्यामुळे मजुरी हाच मुख्य व्यवसाय; पण मुले शिकली पाहिजेत, अशी पालकांची जिद्द. डी.एड.चे शिक्षण पूर्ण झाल्यावर ‘टीईटी’च्या तयारीसाठी लातूरला आलेल्या विठ्ठल राठोड यांना इथे स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण झाली.
- आशपाक पठाण
लातूर - आई-वडील दोघेही निरक्षर. कोरडवाहू दोन एकर जमीन. त्यामुळे मजुरी हाच मुख्य व्यवसाय; पण मुले शिकली पाहिजेत, अशी पालकांची जिद्द. डी.एड.चे शिक्षण पूर्ण झाल्यावर ‘टीईटी’च्या तयारीसाठी लातूरला आलेल्या विठ्ठल राठोड यांना इथे स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण झाली. त्यात चारवेळा अपयश आल्यावरही जिद्द सोडली नाही. संयम ठेवून अभ्यासात सातत्य ठेवल्याने पाचव्या प्रयत्नात तांड्यावरचा हा मुलगा ‘पीएसआय’ झाला.
मुखेड तालुक्यातील सावळी तांडा येथील रहिवासी असलेले विठ्ठल वसंतराव राठोड. आई-वडील मजुरी, शेळ्या सांभाळून घरगाडा चालवितात. दोन मुले, एक मुलगी असे कुटंब. मोठा मुलगा विठ्ठल याचे पूर्ण शिक्षण आश्रमशाळेत झाले. उदगीरच्या आश्रमशाळेत अकरावी, बारावी झाल्यावर डी.एड. केले. शिक्षक व्हायचे म्हणून ‘टीईटी’ची तयारी करण्यासाठी ८ वर्षांपूर्वी गावातून लातूरला आलेल्या विठ्ठल राठोड यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली. मग काय ‘टीईटी’चा नाद सोडला अन् स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात मन रमले. तब्बल तीन वेळा पूर्व परीक्षेत अपयश आले. चौथ्यावेळी मुख्य परीक्षा पास झाल्यावर मुलाखतीत अनुत्तीर्ण झाले. तरीही संयम ठेवला. पाचव्यांदा यश आले, निकाल जाहीर होताच मित्रपरिवार अन् ग्रामस्थांनी कौतुकाचा वर्षाव सुरू केला. अक्षर ओळख नसलेल्या पालकांच्या कौतुकासाठी ग्रामस्थांची रीघ लागली. मार्गदर्शक प्रा. सुधीर पोतदार यांच्या हस्ते लातूरमध्ये भव्य सत्कार करण्यात आला. मित्रांनी पेढे भरविले.
योग्य मार्गदर्शक, संयम, सातत्य महत्त्वाचे...
स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना संयम महत्त्वाचा आहे. अपयश आले म्हणून खचून न जाता अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे. योग्य मार्गदर्शन मिळाले की मन एकाग्र राहते. सतत प्रयत्न करीत राहावेत. मला चारवेळा अपयश आले. वर्ष २०१८ मध्ये गुप्त वार्ता अधिकारी म्हणून निवड झाली; पण उंची मायक्रो २ मध्ये कमी पडल्याने अपयश आले. तरीही खचून न जाता मार्गदर्शक प्रा. सुधीर पोतदार यांच्या मार्गदर्शनात अभ्यासात सातत्य ठेवले. डी.एड. असतानाही शिक्षक पदासाठी कुठलीच परीक्षा दिली नाही. जे लक्ष्य ठेवले त्यात यश मिळाले. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संयम, अभ्यासात सातत्य ठेवावे, असा सल्ला पीएसआय विठ्ठल राठोड यांनी दिला आहे.
दोन्ही भावंडे झाले अधिकारी...
अक्षर ओळख नसलेल्या आई-वडिलांनी दोन्ही मुलांना जिद्दीने शिक्षण दिले. मुलांनीही पालकांच्या कष्टाचे चीज केले. लहान मुलगा भरत राठोड हा दहा महिन्यांपूर्वीच कर सहायक झाला. आता मोठा मुलगा विठ्ठल राठोड हाही साहेब झाला. त्याची आई, पत्नी, बहिणीसह कुटुंबातील सर्वांना खूप आनंद झाल्याचे वडील वसंतराव राठोड यांनी सांगितले. विशेष म्हणजे विठ्ठल यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला असून, त्यांना एक मुलगीही आहे. पत्नीचे शिक्षण दहावीपर्यंतचे असतानाही पती साहेब व्हावा म्हणून सतत प्रेरणा देण्याचे काम त्यांनी केले.