लातूरच्या विद्यार्थ्याने राजस्थानच्या कोटा इथं आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
By राजकुमार जोंधळे | Published: August 28, 2023 08:03 PM2023-08-28T20:03:55+5:302023-08-28T20:04:35+5:30
लातूर जिल्ह्यातील अनेक मुले नीट, जेईईच्या तयारीसाठी राजस्थानातील काेटा येथे आहेत
अहमदपूर (जि. लातूर) : राजस्थानातील कोटा शहरात वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी गेलेल्या उजना (ता. अहमदपूर) येथील एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने सराव पेपर अवघड गेल्याने रविवारी आत्महत्या केली आहे. त्याने काेटा येथील जवाहरनगर परिसरात असलेल्या काेचिंग क्लास इमारतीच्या सहाव्या मजल्यावर उडी मारली. यात ताे गंभीर जखमी हाेऊन रुग्णालयात नेताना मयत झाला आहे. अविष्कार संभाजी कासले असे मयत मुलाचे नाव आहे.
लातूर जिल्ह्यातील अनेक मुले नीट, जेईईच्या तयारीसाठी राजस्थानातील काेटा येथे आहेत. दरम्यान, गत तीन वर्षांपासून अहमदपूर तालुक्यातील उजना येथील आविष्कार कासले काेटा येथे नीट परीक्षेची तयारी करत हाेता. रविवार, २७ ऑगस्ट राेजी नीटची सराव परीक्षा त्याने दिली. मात्र, त्याचा पेपर अवघड गेल्याने क्लासेसच्या सहाव्या मजल्यावरून त्याने उडी मारून आत्महत्या केली.
आविष्कारचे वडील थोडगा केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख तर आई नांदेड जिह्यातील किनवट तालुक्यात शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते अहमदपूर शहरात वास्तव्याला आहेत. अविष्कारचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे अहमदपूर येथे झाले. तो लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता. त्याचा भाऊ हा कोटा येथेच शिक्षण घेऊन हैद्राबाद येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. अविष्कार हा मागच्या तीन वर्षांपासून वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेसाठी एका कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेत होता. क्लासेसपासून थोड्याच अंतरावर तलवंडी भागात भाड्याने घेतलेल्या खोलीत आजी-आजोबा समवेत तो राहत होता.
रविवार, २७ ऑगस्ट रोजी वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेचा सराव पेपर होता. तो पेपर अवघड गेल्याने त्याने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे लातूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मयत आविष्कारच्या पार्थिवावर साेमवारी उजना (ता. अहमदपूर) येथे मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.