पुण्यात लातूरच्या विद्यार्थ्यांना ट्रकने चिरडले; भीषण अपघातात दाेन जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 11:23 PM2024-05-28T23:23:34+5:302024-05-28T23:24:23+5:30
विमानतळ पाेलिस ठाण्यात ट्रकचालक बाबूशाह गौतम याच्याविराेधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकुमार जाेंधळे / औसा (जि. लातूर) : अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या लातूर जिल्ह्यातील औसा, शिरुर ताजबंद आणि उदगीर येथील तिघा विद्यार्थ्यांना भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना पुण्यात साेमवारी रात्री उशिरा घडली. यामध्ये दाेन विद्यार्थी जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर जिल्ह्यातील औसा, शिरुर ताजबंद आणि उदगीर येथील तिघे पुणे येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होते. दरम्यान, सोमवारी रात्री ते दुचाकीवरुन (एम.एच. १२ यू.यू. ६३७५) प्रवास करत हाेते. वाघेश्वर पार्किंगनजीक नाका येथील सिग्नलवर ते थांबले हाेते. यावेळी भरधाव आलेल्या ट्रकने (एम.एच. १२ व्ही.एफ. ६४४१) तिघांनाही चिरडले. या अपघातात औसा येथील फहाद अक्सर उर्फ मन्नान शेख (२०, रा. औसा. ह.मु.उदगीर), आदिल मजहर शेख (वय १९, रा. शिरुर ताजबंद ता. अहमदपूर) हे जागीच ठार झाले. अफान ठाणेदार-शेख (वय २० रा. उदगीर) हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला. दोन्ही विद्यार्थ्यांचा मृतदेह शवविच्छेदनानंतर मंगळवारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
याबाबत विमानतळ पाेलिस ठाण्यात ट्रकचालक बाबूशाह गौतम याच्याविराेधात मंगळवारी गुन्हा दाखल केला असून, त्याला पाेलिसांनी अटक केली आहे. अशी माहिती सपोनि. सुधीर तोरडमल यांनी सांगितले.
अभियंता हाेण्याचे स्वप्न राहिले अधुरे...
फहाद, आदिल आणि अफान हे तीन जीवलग मित्र होते. पुण्यात शिक्षणानिमित्त एकाच खाेलीत राहत हाेते. सध्याला संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते. अभियंता हाेण्याचे तिघांचेही स्वप्न हाेते. मात्र, त्याच्यावर साेमवारी रात्री काळाने घाला घातला आणि अभियंता हाेण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे.
आदिल एकुलता एक मुलगा...
अपघातात दोघा मित्रांचे दुर्दैवी निधन झाले. ही घटना शिरुर ताजबंद आणि औसा येथील कुटुंबासाठी धक्कादायक आहे. एका अपघाताने सर्वकाही हिरावून घेतले. शिरुर ताजबंद येथील आदिल हा एकुलता एक मुलगा हाेता. कुटुंबात आई-वडिल आणि एक लहान बहिण आहे. मुलाला अभियंता बनविण्यासाठी वडिलांनी पुण्याला पाठविले होते. औशातील फहाद शेख हा परिवारात मोठा मुलगा हाेता. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. फहादचा औसा तर आदिलचा शिरुर ताजबंद येथे मंगळवारी रात्री उशिरा दफनविधी झाला.