Latur: ठाणे संघाने पटकावला रस्ता सुरक्षा चषक, बीड उपविजेता, ठाण्याचे मोहन शिंदे मालिकावीर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 10:21 PM2023-03-26T22:21:28+5:302023-03-26T22:21:45+5:30
Latur: लातूर येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने एमएच २४ रस्ता सुरक्षा चषक क्रिकेट स्पर्धेत ठाणे संघाने बीडचा पराभव करून विजेतेपद पटकावले.
- आशपाक पठाण
लातूर : येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने एमएच २४ रस्ता सुरक्षा चषक क्रिकेट स्पर्धेत ठाणे संघाने बीडचा पराभव करून विजेतेपद पटकावले. तर बीडचा संघ उपविजेता ठरला आहे. मालिकावीर म्हणून ठाण्याचे मोहन शिंदे, अंतिम सामन्यात ठाण्याचे प्रसाद नलावडे सामनावीर ठरले.
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत लातूर येथे दयानंद शिक्षण संस्थेच्या मैदानावर आयोजित क्रिकेट स्पर्धेत राज्यभरातील १४ जिल्ह्यातून प्रादेशिक परिवहन विभागाचे संघ सहभागी झाले होते. दोन दिवसीय स्पर्धेत अंतिम रविवारी ठाणे विरूध्द बीड यांच्यात झाला. नाणेफेक जिंकून ठाण्याने फिल्डींग घेतली. बीडच्या संघाने ८ षटकात ७७ धावा काढल्या. त्यानंतर ठाणे संघाने तीन खेळाडू बाद झाल्यावर ७.२ षटकात सामना जिंकला. ठाण्याकडून कर्णधार प्रसाद नलावडे यांनी दोन षटकात ३ खेळाडू बाद केले. त्यामुळे त्यांना सामनावीर घोषित करण्यात आले.
स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज पवन गायके (बीड), उत्कृष्ट गोलंदाज महेश भोसले (बीड) यांनी कामगिरी केली. प्रतिनिधी संघात लातूरने धाराशिव संघाचा पराभव केला. विजेत्या संघाला लातूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत विशेषत: सीटबेल्ट, हेल्मेट, वाहन चालविताना मोबाईल न बोलणे, खाजगी प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांतून धोकादायक प्रवास आदी विषयक माहिती देण्यात आल्याचे उपप्रादेशिक परिवहन विजय भोये यांनी सांगितले.
चालकांनी सुरक्षेला प्राधान्य द्यावे...
यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी नेरपगार म्हणाले, स्पर्धेत खेळत असताना जसे खेळाडून सुरक्षाविषक साधने वापरतात त्याचपध्दतीने रस्त्यावर वाहन चालवित असताना चालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेणे महत्वाचे आहे. नियमांचे पालन केल्यास नक्कीच अपघात होणार नाहीत, पालकांनी लहान मुलांच्या हातात वाहन देत असताना सर्व बाबींचा विचार करावा. वाहनांचा वेग मर्यादेत ठेवणे आवश्यक आहे.