Latur: काेयता घेऊन फिरणाऱ्यांची पाेलिसांनी काढली वरात, एकाला अटक
By राजकुमार जोंधळे | Updated: March 17, 2024 23:34 IST2024-03-17T23:34:24+5:302024-03-17T23:34:47+5:30
Latur News: लातूर शहरातील बार्शी राेडवर एका पेट्राेल पंपासमाेर काेयता, कत्तीचा धाक दाखवून खंडणी उकळणाऱ्या, वाहनाची तोडफोड करणाऱ्या दाेघांपैकी एकाला पाेलिसांनी अटक केली. दरम्यान, ताेडफाेड, काेयत्याचा धाक दाखवत दहशत निर्माण केलेल्या भागात पाेलिसांनी आराेपीची वरात काढली.

Latur: काेयता घेऊन फिरणाऱ्यांची पाेलिसांनी काढली वरात, एकाला अटक
- राजकुमार जाेंधळे
लातूर - शहरातील बार्शी राेडवर एका पेट्राेल पंपासमाेर काेयता, कत्तीचा धाक दाखवून खंडणी उकळणाऱ्या, वाहनाची तोडफोड करणाऱ्या दाेघांपैकी एकाला पाेलिसांनी अटक केली. दरम्यान, ताेडफाेड, काेयत्याचा धाक दाखवत दहशत निर्माण केलेल्या भागात पाेलिसांनी आराेपीची वरात काढली. या वरातीचा व्हिडीओ साेशल मीडियात व्हायरल झाल्याने टवाळखाेरांचे धाबे दणाणले आहेत.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील बार्शी राेडवरील एका पेट्रोल पंप परिसरात दोघांनी हातात काेयता, कत्ती घेऊन रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांना धमकावत गाड्यांची तोडफोड केली शिवाय, नागरिकांचे मोबाइल जबरदस्तीने हिसकावले. भाजी विक्रेत्यांना कत्तीचा धाक दाखवून खंडणी वसूल केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेनंतर दुचाकीवरून आराेपी पसार झाले. वर्णन, चेहरापट्टीच्या आधारे पाेलिसांना आराेपींचा सुगावा लागला. लातुरातील मध्यवर्ती बसस्थानकात आराेपी लपून बसल्याची माहिती मिळाली. तोहिद अकबर पठाण (वय २१, रा. वीर हनुमंतवाडी, लातूर) याला दोन मोबाइल, दुचाकी आणि कत्तीसह अटक केली. त्याचा साथीदार वैभव ऊर्फ मोन्या शिवराज बनसोडे (रा. पटेलनगर, लातूर) हा पसार झाला. पाेलिसांनी आराेपीची वरात काढत धडा शिकविला.
ही कारवाई पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे, अप्पर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, एमआयडीसी ठाण्याचे पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे, सपोनि. देवकते, पोउपनि. श्रीकांत मोरे, राष्ट्रपाल लोखंडे, सपोउपनि. सूरज जगताप, खुर्रम काझी, यशपाल कांबळे, भोसले, प्रशांत ओगले, योगेश चिंचोलीकर, तुरे यांच्या पथकाने केली.
हे आहेत चार ठाण्यांच्या रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगार...
अटकेतील आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविराेधात लातुरातील शिवाजीनगर, गांधी चौक, एमआयडीसी आणि विवेकानंद चौक पाेलिस ठाण्यात जबरी चोरी, मारामारी, दरोडा टाकण्याचा प्रयत्न करताना दुखापत करणे, आदी गंभीर स्वरूपाचे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत; तर गुन्ह्यातील फरार वैभव ऊर्फ मोन्या शिवराज बनसोडे यांच्या मागावर पाेलिस आहेत. त्यालाही लवकरच अटक केली जाणार आहे. - साहेबराव नरवाडे, पाेलिस निरीक्षक, लातूर