लातूर ते पंढरपूर, शिखर शिंगणापूर ५०० रुपयांत! देवदर्शनासाठी महिलांसाठी स्पेशल बस
By हणमंत गायकवाड | Published: August 9, 2023 03:20 PM2023-08-09T15:20:28+5:302023-08-09T15:24:13+5:30
लातूर आगाराने हा उपक्रम अधिक मास आणि श्रावणानिमित्त सुरू केला आहे.
लातूर : अधिक मास आणि श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर एस. टी. महामंडळाच्या लातूर आगाराने महिलांना देवदर्शनासाठी खास यात्रा स्पेशल बसची सोय केली आहे. लातूर ते पुरुषोत्तमपुरी, औंढा नागनाथ, परळी, परत लातूर आणि लातूर ते पंढरपूर, शिखर शिंगणापूर देवदर्शनासाठी बसेस सोडल्या जाणार आहेत. ४३ महिला प्रवासी भेटल्यानंतर पाचशे रुपयांत या दोन मार्गावर ट्रीप केली जाणार आहे.
पाचशे रुपयात येणे-जाणे असणार आहे. लातूर आगाराने हा उपक्रम अधिक मास आणि श्रावणानिमित्त सुरू केला आहे. पंढरपूरला एक ट्रीप झाली असून, येणाऱ्या बुधवारी शिखर शिंगणापूरला दुसरी ट्रीप होणार आहे. महामंडळाच्या या उपक्रमामुळे महिलांना देवदर्शनाची सोय उपलब्ध झाली आहे. एकत्रित येऊन महिला लातूर ते पुरुषोत्तम पुरी, औंढा नागनाथ, परळीसाठी तसेच लातूर ते पंढरपूर शिखर शिंगणापूर अशी ट्रीप आयोजित करत असतील तर संपर्क साधावा.
एकत्र येऊन मागणी केली तर बस सोडणार
दोन मार्गांसाठी सर्वसाधारण हजार ते बाराशे रुपये तिकीट आहे. परंतु, अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर खास महिलांसाठी ही यात्रा स्पेशल सोय करण्यात आली आहे.
महिलांना सन्मान योजना असल्यामुळे महामंडळाने महिलांसाठी खास यात्रा स्पेशल बस सोडण्याचे नियोजन केले आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे लातूर बसस्थानक प्रमुख ह. लीं. चपटे यांनी केले आहे.
एकत्र येऊन ४३ महिला प्रवाशांनी मागणी केली तर देवदर्शनासाठी बस सोडली जाईल. त्यासाठी आगाराशी संपर्क साधावा, असे आवाहन स्थानक प्रमुख हणमंत चपटे यांनी केले आहे.