Latur: चाेरीतील बारा दुचाकींसह दोघांना लातूरमधून अटक, आठ गुन्ह्यांचा उलगडा
By राजकुमार जोंधळे | Updated: January 22, 2025 05:45 IST2025-01-22T05:45:34+5:302025-01-22T05:45:57+5:30
Latur News: लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून चोरी करण्यात आलेल्या बारा दुचाकींसह दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली. चौकशीत आठ गुन्ह्यांची उकल झाली आहे.

Latur: चाेरीतील बारा दुचाकींसह दोघांना लातूरमधून अटक, आठ गुन्ह्यांचा उलगडा
- राजकुमार जाेंधळे
लातूर - शहरासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून चोरी करण्यात आलेल्या बारा दुचाकींसह दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली. चौकशीत आठ गुन्ह्यांची उकल झाली आहे.
पोलिसांनी सांगितले, लातूर शहर आणि जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत वाहन चोरीसह इतर गुन्ह्यांचे प्रमाण अलीकडे वाढले असून, ग्रामीण भागातही दुचाकीच्या चोऱ्या होत आहेत. या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले आहेत. या आदेशानुसार स्थानिक पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीचा, वाहन चोरणाऱ्या टोळीचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना खबऱ्याने माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने संशयित आरोपी श्रीरंग लक्ष्मण सारगे (वय ५०, रा. गव्हाण, ता. निलंगा, जि. लातूर), गोवर्धन व्यंकटी काळे (वय ३४, रा. अंबाजोगाई रोड, अहमदपूर, जि. लातूर) यांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता, चोरी केलेल्या बारा दुचाकी पोलिसांच्या हाती लागल्या. या दुचाकी लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून चोरी केल्याचे ताब्यातील आरोपींनी सांगितले.
सहा ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त...
लातुरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २ गुन्हे, विवेकानंद चौक २, गांधी चौक, निलंगा, अहमदपूर आणि चाकूर ठाण्यांच्या हद्दीतील प्रत्येकी एक गुन्हा असे आठ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी २ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोघांना अटक केली आहे.
स्थागुशाच्या या पथकाने दोघा आरोपींना उचलले...
ही कारवाई स्थागुशाचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, माधव बिल्लापट्टे, नवनाथ हासबे, तुराब पठाण, संजय कांबळे, राजेश कंचे, पुठ्ठेवाड, नकुल पाटील, सिद्धेश्वर जाधव, सुधीर कोळसुरे, राहुल सोनकांबळे, युवराज गिरी, मोहन सुरवसे यांच्या पथकाने केली आहे.