लातुरच्या महाळंगीत वीज पडून दोन शेतकरी जागीच ठार

By हरी मोकाशे | Published: May 26, 2024 08:41 PM2024-05-26T20:41:31+5:302024-05-26T20:42:14+5:30

विद्युतखांब जमीनदोस्त; पत्रे उडाल्याने अनेकांचा संसार उघड्यावर

Latur Two farmers were killed on the spot due to lightning in Mahalangi | लातुरच्या महाळंगीत वीज पडून दोन शेतकरी जागीच ठार

लातुरच्या महाळंगीत वीज पडून दोन शेतकरी जागीच ठार

चाकूर (जि. लातूर) : तालुक्यातील महाळंगी येथे रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्याचा तडाखा संपूर्ण गावास बसला. विजेच्या ट्रान्सफार्मसह झाडे उन्मळून पडली. दरम्यान, वीज पडून दोघा शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. गावात अनेकांच्या घरावरील पत्रेही उडाली. त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठाही खंडित झाला आहे.

शिवाजी नारायण गोमचाळे (३०) व ओमकार लक्ष्मण शिंदे (३५) असे मयत दोघा शेतकऱ्यांची नावे आहेत. रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास महाळंगी येथे जोरदार वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, शिवाजी नारायण गोमचाळे व ओमकार लक्ष्मण शिंदे हे शेतकरी शेतात काम करीत होते. तेव्हा वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

प्रचंड मोठ्या प्रमाणावर आलेल्या वादळी वाऱ्याचा तडाखा संपूर्ण गावास बसला आहे. त्यामुळे विद्युत खांब जमीनदोस्त झाले. त्याचबरोबर विजेचे ट्रान्सफार्मरही पडले. शिवाय, अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. यात एक ऑटो, ट्रॅक्टरचेही नुकसान झाले असून अनेकांचा संसार उघड्यावर पडला आहे. वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. अनेकांच्या घरावरील वाऱ्याने उडाली आहे. त्यात जवळपास २० ते २५ लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

जानवळ आरोग्य केंद्रात शवविच्छेदन

वीज पडून शिवाजी गोमचाळे, ओमकार शिंदे या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीसाठी त्यांचे पार्थिव जानवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मयत शिवाजी गोमचाळे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा तर ओमकार शिंदे यांच्या पश्चात आई, पत्नी व चार मुली असा परिवार आहे.

घर, वाहनांवर झाडे कोसळली

महाळंगीत वादळी वाऱ्याचा वेग भयानक होता. अनेक लोक वादळामुळे घाबरली होती. काही क्षणातच अनेकांच्या घरावरील पत्रेही उडाली. तसेच लखन सोळुंके यांच्या ऑटोवर झाड पडल्याने नुकसान झाले आहे. तसेच एक वडाचे झाड ट्रॅक्टरवर उन्मळून पडल्याने चालक किरण सोळंके यांच्या हाताला दुखापत झाली आहे. बशीर सय्यद यांच्या किराणा दुकानावर झाड कोसळल्याने दुकानातील साहित्याचे नुकसान झाले आहे. गावातील किरण सम्मुखराव, अकबर सय्यद, रसूल शेख, महादू हणमंते, रमेश सन्मुखराव, मुस्तफा शेख आदींसह अनेकांच्या घरावरची पत्रे उडून गेली. त्यात काहींचा आसरा गेला आहे. वादळी वारे आणि पावसात अनेकांच्या संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे.

२०० झाडे, १९ विद्युत पोल उखडले

महाळंगी शिवारात वादळी वाऱ्याने जवळपास २०० हून अधिक झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने १९ विद्युत पोलही उखडले आहेत. तसेच दोन डीपीही पडले आहेत. त्यामुळे गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान, गोठ्यात बांधण्यात आलेल्या जनावरांवर पत्रे पडून दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी अनुपमा निंबाळकर, तलाठी विष्णू वजीरे यांनी महाळंगी गावात भेट देऊन पाहणी केली. या घटनेत सुमारे २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Web Title: Latur Two farmers were killed on the spot due to lightning in Mahalangi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.