लातूर-जहिराबाद राष्ट्रीय महामार्ग २४ तासानंतरही वाहतुकीस बंदच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 10:22 AM2021-09-30T10:22:54+5:302021-09-30T10:23:29+5:30
महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्याची वाहतूक ठप्प
-बालाजी थेटे
औराद शहाजानी (जि. लातूर) : जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे औराद शहाजनी परिसरातील मांजरा-तेरणा संगमावर पूरस्थिती चौथ्या दिवशीही कायम असून, यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे.
राष्ट्रीय महामार्ग ७५२ के वरील औराद शहाजानी येथील पुल तेरणा नदीच्या पाण्यात गेल्याने महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश या चार राज्याची वाहतूक गेल्या २४ तासापासुन बंदच आहे. दाेन्ही बाजुने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान मांजरा तेरणा नदीच्या पुराचे पाणी दाेन्ही नदी संगमावर पसरुन बँक वाँटर अनेक गावात घुसले आहे.
गुलाब वादळामुळे लातुर व उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने अगोदरच मांजरा तेरणा नदीचे पात्र भरून वाहत असताना यात पावसाचे पाणी मांजरा व तेरणा प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आल्यानंतर पूरस्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील हजारो हजारो हेक्टर जमीन पिकासह पाण्याखाली गेली. यातच औराद शहाजनी येथे तेरणा मांजरा नदीचा संगम होतो. या दोन्ही नद्याचे पुराचे पाणी एकत्र आल्याने दहा किलोमीटर पाणी पसरले आहे. नदीकाठच्या हालसी, तगरखेडा, हंचनाळ, चिचोंडी, वांजरखेडा, जामखंडी, हालसी, तुगाव, औराद माने, जवळगा, सावरी, नदीवाडी यासह अनेक गावांच्या सखल भागात पाणी पसरले आहे. हालसी गावात तर मांजरा नदीचे पाणी ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये ग्रामस्थांना स्थलांतरित केले होते त्या शाळेत सुद्धा पोचले आहे
प्रशासनाने गावातच उंच ठिकाणी अनेक गावातील नागरिकांना स्थलांतरित केले आहे. दुपारनंतर पूरस्थिती निवळेल असे, निलंगा तहसीलदार गणेश जाधव यांनी सांगितले. आत्तापर्यंत हासली, हंचनाळ, चिचांडी गावातील १०० लाेकांना स्थलांतरित केल्याचे औराद पाेलिस ठाण्याचे सपाेनि संदीप कामत यांनी सांगितले.