लातूर जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्रांवर लक्ष; दर्जा उंचावण्यासाठी दर महिन्याला होणार गुणांकन!
By हरी मोकाशे | Published: January 19, 2024 05:32 PM2024-01-19T17:32:59+5:302024-01-19T17:35:07+5:30
प्राथमिक आरोग्य केंद्रांतून दिलेल्या सुविधांची तपासणी
लातूर : गाव, वाडी- तांड्यावरील रुग्णांना अधिकाधिक चांगली आरोग्य सेवा मिळावी. तसेच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांनी अत्यावश्यक सुविधा तत्पर द्याव्यात आणि कुठल्याही कामात मागे राहू नये म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने नववर्षापासून अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आरोग्य केंद्रांतून देण्यात आलेल्या सुविधांचे गुणांकन करुन अग्रस्थानी आलेल्या केंद्रांचा गौरव केला जाणार आहे. या मोहिमेमुळे प्राथमिक केंद्रातील आरोग्य सेवांचा दर्जा उंचावणार आहे.
जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती असून एकूण ५० आयुष्मान आरोग्य मंदीर (प्राथमिक आरोग्य केंद्र) आहेत. त्याअंतर्गत २५२ उपकेंद्र आहेत. या आरोग्य केंद्रातून शासनाच्या विविध आरोग्यविषयक मोहिमा राबविण्याबराेबरच सेवा देण्यात येतात. त्यामुळे खेड्यातील रुग्णांसाठी हे केंद्र अत्यंत महत्त्वाचे आहेत. दरम्यान, राज्य शासनाने १५ ऑगस्टपासून मोफत आरोग्य सेवा देण्यास सुरुवात केल्याने रुग्ण संख्या वाढली आहे. रुग्णांना दर्जेदार व विनाविलंब सेवा मिळावी. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आरोग्य केंद्रांतील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या संकल्पेनतून 'पीएचसी रिपार्ट कार्ड' मोहीम राबविण्यात येणार आहे.
अत्यावश्यक १० सेवा- सुविधांना प्राधान्य...
नवीन उपक्रमामध्ये १० अत्यावश्यक सेवा- सुविधांची पाहणी केली जाणार आहे. त्यात गरोदर माता व बालकांची नोंदणी, आयुष्मान कार्ड किती काढले, कुटुंब कल्याण नियोजन शस्त्रक्रिया, आरोग्य केंद्रात प्रसूती, क्षयरुग्ण तपासणी, उपचार व त्यांना आहार, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना, ऑनलाईन माहिती वेळेत भरणे, प्रत्येक आरोग्य केंद्रातील निवडलेल्या दोन गावांतील नागरिकांची कर्करोग, मधुमेह व रक्तदाब पूर्व तपासणी करुन उपचार, अतिजोखमीच्या मातांना सेवा देण्यासाठी आशामार्फत पाठपुरावा, उपलब्ध निधीचा वेळेत खर्च अशा दहा बाबींवर तपासणी केली जाणार आहे.
रुग्णांना लाभ देण्यासाठी प्रयत्न...
जिल्हा परिषदेचे सीईओ अनमोल सागर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणारी पीएचसी रिपोर्ट कार्ड ही मोहीम शंभर गुणांची असणार आहे. रुग्णांना अधिकाधिक सेवा देण्याचा प्रयत्न राहणार आहे. याशिवाय, चांगले कार्य करुन अधिक गुण मिळविणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात येणार आहे. त्यातून कर्मचाऱ्यांचे आणखीन मनोबल वाढेल. सर्वाधिक गुण घेणाऱ्या आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे यांनी सांगितले.
आरोग्य सेवेचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन...
प्राथमिक आरोग्य केंद्रांत उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पीएचसी रिपोर्ट कार्ड मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यातून ग्रामीण भागातील आराेग्य केंद्रांतून अधिकाधिक सुविधा देण्यासाठी स्पर्धा निर्माण होणार आहे. त्यामुळे आरोग्य सेवेचा दर्जा उंचावणार आहे. उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.
- अनमोल सागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.