राष्ट्रीय स्तरावरील 'एनकॉस'च्या मानांकनाची लातूर जिल्हा परिषदेस उत्सुकता!

By हरी मोकाशे | Published: November 29, 2023 05:36 PM2023-11-29T17:36:48+5:302023-11-29T17:37:44+5:30

केंद्रीय पथकाकडून ८ आरोग्य केंद्रांची तपासणी

Latur Zilla Parishad is eager for the rating of National 'Encos' in the health department! | राष्ट्रीय स्तरावरील 'एनकॉस'च्या मानांकनाची लातूर जिल्हा परिषदेस उत्सुकता!

राष्ट्रीय स्तरावरील 'एनकॉस'च्या मानांकनाची लातूर जिल्हा परिषदेस उत्सुकता!

लातूर : राष्ट्रीय स्तरावरील आणि शासनाच्या आरोग्य विभागात सर्वोच्च गणल्या जाणाऱ्या नॅशनल हेल्थ सिस्टीम रिसोर्स सेंटर (एनकॉस) मार्फत गत आठवड्यात जिल्ह्यातील आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे मुल्यांकन करण्यात आले. पथकाने दर्जेदार आरोग्यसेवा मिळत असल्याचे पाहण्याबरोबरच रुग्णांनीही उत्कृष्ट आरोग्य सेवेची माहिती दिली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेस मुल्यांकनाचा अहवाल अन् मानांकनाची उत्सुकता लागली आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गुणवत्तापूर्ण सेवा- सुविधा देत राज्याबरोबरच देशस्तरावर आपला ठसा उमटविला आहे. त्यामुळे केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालयअंतर्गतच्या नॅशनल हेल्थ सिस्टिम रिसोर्स सेंटर (एनकॉस) मार्फत उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा- सुविधा देणाऱ्या आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे मुल्यांकन करण्यात यावे म्हणून आरोग्य विभागाकडून दोन वर्षांपासून प्रयत्न सुरु होते. अखेर ३० ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत देशातील विविध राज्यातील १० तज्ज्ञांच्या पाच पथकांनी तपासणी केली आहे. या पथकाने प्रत्येक आरोग्य केंद्रावर दोन दिवस थांबून मुल्यांकन केले.

सेवेबरोबर कर्मचाऱ्यांच्या ज्ञानाची चाचणी...
या पथकाने प्रत्येक केंद्रात एक हजारपेक्षा अधिक मुद्द्यांचे रेकॉर्ड तपासले. शिवाय, कर्मचाऱ्यांच्या ज्ञानाची चाचण्या घेतल्या. बाह्यरुग्ण विभाग, प्रसूतीगृह, प्रयोगशाळा, राष्ट्रीय कार्यक्रम, प्रशासन, आंतररुग्ण विभाग अशा सहा विभागांची सखोल तपासणी केली. तसेच या आरोग्य केंद्रांची तयारी, देण्यात येणाऱ्या सेवा, रुग्णांच्या प्रतिक्रियाही घेण्यात आल्या आहेत.

या आरोग्य केंद्रांचे झाले मुल्यांकन...
जवळा बु. (ता. लातूर), वांजरवाडा (ता. जळकोट), हडोळती, शिरुर ताजबंद (ता. अहमदपूर), जवळगा पो., लामजना (ता. औसा), कासार बालकुंदा (ता. निलंगा), हंडरगुळी (ता. उदगीर) या आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे.

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली जोरदार तयारी...
आरोग्य क्षेत्रात सर्वोच्च गणल्या जाणाऱ्या एनकॉसच्या तपासणीसाठी नोडल अधिकारी डॉ. अर्चना पंडगे, डॉ. प्रशांत कापसे, समन्वयक डॉ. पल्लवी रेड्डी यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, तसेच क्षयरोग, कुष्ठरोग, आरबीएसकेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

मानांकन मिळाल्यास तीन वर्षे बक्षीस...
एनकॉसचे मानांकन मिळाल्यास प्रत्येक आरोग्य केंद्रास सलग तीन वर्षे तीन- तीन लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. त्यातून आरोग्य सेवा आणि गुणवत्ता आणखीन वाढविण्यास मदत होणार आहे. शिवाय, कर्मचाऱ्यांना वैयक्तिक सुविाध देण्यासाठी मदत करता येते. त्यामुळे या मानांकनाकडे लक्ष लागून आहे.

कायाकल्पमध्येही लौकिक...
केंद्र शासनाच्या कायाकल्प योजनेत गेल्या वर्षी जिल्ह्यास ३१ लाखाचे बक्षीस मिळाले. राज्यात सर्वाधिक पुरस्कार मिळविणारे लातूर हे ठरेल आहे. त्याचबरोबर गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेबद्दल पंतप्रधानांच्या हस्तेही गौरव झाला आहे.

आणखीन मनोबल वाढले...
एनकॉसच्या तपासणीसाठी दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरु होता. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात मुल्यांकन होत आहे. यातून पुरविलेल्या सेवा दाखविण्यास वाव मिळाला आहे. मानांकन मिळाल्यास आणखीन मनोबल वाढणार आहे.
- डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

Web Title: Latur Zilla Parishad is eager for the rating of National 'Encos' in the health department!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.