जि.प. शाळांतील गुरुजींसाठी ‘शिक्षक प्रेरणा परीक्षा’
By संदीप शिंदे | Published: May 12, 2023 04:32 PM2023-05-12T16:32:27+5:302023-05-12T16:34:19+5:30
विभागीय आयुक्तांची संकल्पना : पहिली ते दहावीच्या शिक्षकांचा समावेश.
लातूर : शिक्षकांचे विषयज्ञान वृद्धिंगत व्हावे, त्यांना स्वयंअध्ययनाची गोडी लागावी, स्पर्धात्मक वातावरणात स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळावी, यासाठी विभागीय आयुक्तांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद शाळांमधील गुरुजींसाठी शिक्षक प्रेरणा परीक्षा घेण्यात येणार आहे. पहिली ते दहावीच्या वर्गातील शिक्षकांना ही परीक्षा देता येणार असून, त्याअनुषंगाने आवश्यक समित्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
शिक्षक प्रेरणा परीक्षा ही ऐच्छिक स्वरुपाची असून, प्रश्नपत्रिका विभागस्तरावरुन ए, बी, सी या संचाप्रमाणे तयार करण्यात येणार आहेत. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी एकाच वेळी परीक्षा होणार असून, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी व जीवशास्त्र या विषयांवर प्रत्येकी ५० प्रश्नांची प्रश्नपत्रिका असणार आहे. चुकीच्या एका उत्तरासाठी ०.५ गुण वजा केले जाणार असून, एका तासाची परीक्षा होणार आहे. ओएमओ मशीनवर उत्तरपत्रिका तपासल्या जाणार असून, अंतिम गुणाच्या आधारे एकूण गुणापैकी ५० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण घेणाऱ्या परीक्षार्थ्यांस उत्तीर्ण ठरविले जाणार आहे. अंतिम निकाल जाहीर झाल्यावर जिल्हास्तरावर गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या ५० परीक्षार्थ्यांची नावे, उत्तीर्ण परीक्षार्थींची नावे व एकूण निकाल जिल्हास्तरावर घोषित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातून प्रथम येणाऱ्या ५० परीक्षार्थींना सत्कारपुर्वक कार्यक्रमाचे आयोजन करुन सेस फंडातून जिल्हाधिकारी यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे.
परीक्षेच्या नियोजनासाठी समित्या गठीत...
परीक्षेस इच्छुक असणाऱ्या तसेच नसणाऱ्या शिक्षकांची यादी निश्चित करावी लागणार असून, विभागस्तरावरुन प्राप्त प्रश्न पत्रिकांची परीक्षार्थींच्या प्रमाणात छपाई करुन घ्यायची आहे. परीक्षा केंद्र निश्चिती, पर्यवेक्षक, केंद्रसंचालक, झोनल ऑफीसर यांची नियुक्ती होणार असून, परीक्षार्थी शिक्षकांना बैठक क्रमांक देऊन केंद्रावर आसनव्यवस्था करण्यात येणार आहे. सोबतच परीक्षा संपल्यावर उत्तरपत्रिका सीलबंद स्वरुपात जिल्हा कक्षात जमा कराव्या लागणार आहेत. परीक्षेसाठी आवश्यक समित्या गठीत करण्यात आल्या असून, त्यानुसार नियोजन करण्यात येत आहे.
परीक्षेसाठी हा राहणार अभ्यासक्रम...
शिक्षक प्रेरणा परीक्षेसाठी ५ वी ते १२ वी पर्यंतच्या एसीईआरटी व एनसीईआरटी पाठ्यपुस्तकांमधील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी व जीवशास्त्र विषयासंबधीचा अभ्यासक्रम राहील. परीक्षा दिनांक व वेळ स्वतंत्ररित्या कळविण्यात येणार असून, परीक्षेची गोपनीयता व दर्जा राखण्याची जबाबदारी ही संबधित जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची राहणार असल्याचेही विभागीय आयुक्तांनी पत्रात म्हंटले आहे.