मोठा बदल, जागेचे वाद टाळण्यासाठी ग्रामपंचायतही मागविणार आता फेरफारवेळी हरकती!
By हरी मोकाशे | Published: December 22, 2023 07:14 PM2023-12-22T19:14:07+5:302023-12-22T19:15:04+5:30
कुठल्याही घराच्या जागेची नोंद ग्रामपंचायतीच्या नमुना नं. ८ मध्ये करणे बंधनकारक आहे.
लातूर : घरजागेच्या वादावरून नेहमीच वाद होतात. काही वेळेस ही प्रकरणे जिल्हा प्रशासनाबरोबरच न्यायालयापर्यंत पोहोचतात. परिणामी, त्यात वेळ जातो. तसेच, मानसिक ताणही सहन करावा लागतो. अशा प्रकारचे तंटे जिल्ह्यात निर्माण होऊ नयेत म्हणून जिल्हा परिषदेच्या सीईओंनी आता घरजागेच्या फेरफारची नोंद करतेवेळी हरकती मागविण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना केल्या आहेत.
कुठल्याही घराच्या जागेची नोंद ग्रामपंचायतीच्या नमुना नं. ८ मध्ये करणे बंधनकारक आहे. त्यानुसार प्रत्येक जागामालक नोंदी करून घेत असतो. दरम्यान, काहीजण अधिकृत वाटणीपत्र, वारसा प्रमाणपत्र, संमतीपत्र, मृत्युपत्र अथवा खरेदीखत केलेले आवश्यक ते कागदपत्र न जोडता ग्रामपंचायतीच्या नमुना नं. ८ वर नोंदी करण्याचा प्रयत्न करतात. काही वेळेस स्थानिक दबावापोटी नोंदी होतात. मात्र ,तद्नंतर तक्रारी होऊन वाद निर्माण होतात. दरम्यान, अशा तक्रारींचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ अनमोल सागर यांनी नव्याने काही सूचना केल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारात सुसंगतपणा व सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे.
फेरफार अर्जांची होणार पडताळणी...
फेरफारसाठीचा अर्ज दाखल झाल्यानंतर ग्रामसेवकाने नोंदवहीत नोंद करून पोहोच देणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीचा करभरणा केल्याची खात्री करून घ्यावी. अपूर्ण कागदपत्रे असल्यास सात दिवसांत लेखी पत्राद्वारे अर्जदारास कळवावे. फेरफारसाठीची आवश्यक ती कागदपत्रे जोडली असल्यास ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर त्याची माहिती डकवून हरकती मागवाव्यात.
हरकती आल्यास चौकशी करा...
फेरफार अर्जासंदर्भात हरकती आल्यास सुनावणी घ्यावी तसेच चौकशी करावी. हरकती नसतील तर अर्ज मासिक सभेत ठेवावा. तद्नंतर कोणी विरोध केल्यास त्याची वरिष्ठ कार्यालयास माहिती द्यावी. मासिक सभेत फेरफार मंजूर झाल्यास त्याची फेरफार रजिस्टरमध्ये नोंद घ्यावी.
ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात होणार वाढ...
जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी शहरी भागाजवळ २३ ग्रामपंचायती आहेत. पाच हजार लोकसंख्येपेक्षा अधिक ग्रामपंचायतींची संख्या ४५ आहे. खुल्या जागेसाठी खरेदी खताच्या मूल्यांकनाच्या चार टक्क्यानुसार फेरफार शुल्क आकारले जाणार आहे. तर, बांधकाम केलेल्या जागेसाठी दोन टक्के शुल्क असणार आहे. तसेच, उर्वरित ग्रामपंचायती पाच हजार लोकसंख्येच्या आतील आहेत.
७१८ ग्रामपंचायती ५००० लोकसंख्येपेक्षा कमी...
जिल्ह्यातील ७१८ ग्रामपंचायती या ५ हजारांपेक्षा कमी लोकसंख्येच्या आहेत. त्यामुळे तिथे खुल्या जागेसाठी फेरफार शुल्क पाच टक्के, तर बांधकाम केलेल्या जागेसाठी २.५ टक्के फेरफार शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यातून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही भर पडणार आहे.
आता फेरफार शुल्क निश्चित...
ग्रामपंचायतीत सुसंगतपणा व एकसूत्रता राहण्यासाठी फेरफार करतेवेळी घ्यावयाच्या दक्षतेसंदर्भात काही सूचना केल्या आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे कमी-जास्त फेरफार शुल्क राहणार नाही. त्याचबरोबर हरकती मागविल्यामुळे भविष्यात कुठलेही वाद निर्माण होणार नाहीत. या सूचनांचे ग्रामपंचायतींनी पालन करणे बंधनकारक आहे.
- अनमोल सागर, सीईओ.
मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे...
ग्रामपंचायतीच्या कारभारात सुसूत्रता येण्यासाठी सीईओ अनमोल सागर यांनी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्याचे ग्रामपंचायत, सरपंच, नागरिकांनी पालन करावे.
- दत्तात्रय गिरी, डेप्युटी सीईओ.
प्रभावक्षेत्रातील ग्रामपंचायती २३
५ हजारपेक्षा अधिक लोकसंख्येच्या ग्रामपंचायती ४५
५ हजारपेक्षा कमी लोकसंख्येच्या ग्रामपंचायती ७१८