लातूरकर घेणार पूरग्रस्त भागातील १०० विद्यार्थी दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 12:21 PM2019-08-23T12:21:47+5:302019-08-23T12:26:55+5:30
पालकमंत्री पाटील यांचा पुढाकार
लातूर : लातूर पॅटर्न अकरावी, बारावीसाठी प्रसिद्ध आहे़ नीट, जेईईसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी लातूरला येतात़ कोल्हापूर, सांगली, सातारा या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक मदत व्हावी म्हणून पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून ११ वी, १२ वी साठी १०० विद्यार्थी दत्तक घेण्याचा निर्णय झाला़ यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी बैठक झाली़
या बैठकीत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील विविध शैक्षणिक संस्था, शिकवणी वर्ग व वसतिगृह चालक विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सरसावले आहेत़ कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत पुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले़ अनेक शाळा, महाविद्यालयातील शालेय साहित्यही पुरात वाहून गेले आहे़ पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची एक वेगळी मदत व्हावी हा यामागील हेतू आहे. लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या समन्वयातून दोन वर्षे पूरग्रस्त भागातील किमान १०० विद्यार्थ्यांना ११ वी व १२ वी हे दोन वर्षे आपण शैक्षणिक सुविधा, राहणे, भोजन, कपडे, खाजगी शिकवणी आदींची सोय करणार आहोत़ ही मदत एक वेगळ्या प्रकारची असून, यातून आपले विशेष सहकार्य होईल़ त्यामुळे लातूर जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था व क्लासेस चालकांनी मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असेही पालकमंत्री म्हणाले.
शिक्षण विभाग देणार एक दिवसाचे वेतन
माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे एक दिवसांचे वेतन सदरील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी देण्याचे बैठकीत जाहीर केले़ राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ महादेव गव्हाणे म्हणाले, महाविद्यालयाकडून कला व वाणिज्य शाखेसाठी २० ते २५ विद्यार्थ्यांची सोय केली जाईल़ याशिवाय, महाविद्यालयाकडून एक दिवसाचे वेतनही आम्ही पूरग्रस्तांना देणार आहोत़मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी १० ते १२ सर्व शाखेतील विद्यार्थ्यांचा दोन वर्षांचा खर्च उचलणार असल्याचे सांगितले़ जेएसपीएम शिक्षण संस्थेचे अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी १०, रेणुकाई पॅटर्नचे १०, डी़एऩ केंद्रे ५, श्री त्रिपुरा कनिष्ठ महाविद्यालयाकडून १० विद्यार्थी दत्तक घेत असल्याचे संबंधितांनी यावेळी बैठकीत सांगितले़
दोन वर्षांसाठी शैक्षणिक मदत : लातूर शहरातील विविध शाखेत पूरग्रस्त भागातील १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल़ जेईई, नीट आदी परीक्षांची तयारीही करून घेतली जाईल़ यासाठी विद्यार्थ्यांवर होणारा संपूर्ण खर्च लोकसहभागातून होणार असून यासाठी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पुढाकार घेतला आहे़ तर जिल्हाधिकारी सर्व संस्थांशी समन्वय करीत आहेत़ विद्यार्थ्यांना दोन वर्षांसाठी मदत केली जाणार आहे.